(रत्नागिरी /प्रतिनिधी)
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून रॉंग साईडने भरधाव वेगात रिक्षा चालविणाऱ्या चालकामुळे शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे भीषण अपघात घडला. या अपघातात पोलिस कर्मचाऱ्यांसह चार जण किरकोळ जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश शांताराम गाडेकर (वय ४८, रा. पामेडी बुद्रुक, मयेकरवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे २८ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास रिक्षा (एमएच-०८-बीसी-३९४४) साळवी स्टॉप येथून मारुती मंदिरच्या दिशेने चालवत होते. मारुती मंदिर सर्कल येथे आल्यानंतर नियमानुसार सर्कलला वळसा घालून कोकणनगरकडे जाण्याऐवजी त्यांनी रिक्षा रॉंग साईडने भरधाव वेगात चालविली. त्याचवेळी जेल नाका ते साळवी स्टॉप मार्गावरून येणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या सरकारी बोलेरो (एमएच-१२-एसक्यू-२०८२) वाहनाला रिक्षेची जोरदार धडक बसली. या अपघातात सरकारी वाहनाच्या चालक शलाका आनंद मयेकर, पोलिस कर्मचारी आंब्रे, प्रवासी आदिल अश्रफ आमदानी तसेच रिक्षाचालक संदेश गाडेकर हे किरकोळ जखमी झाले. दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी पोलिस हवालदार नितीन प्रभाकर डोमणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात संदेश गाडेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १८४ अन्वये गुन्हा (क्र. २०९/२०२६) नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.

