(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका लॉजमध्ये ३४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी उघडकीस आलेल्या या घटनेची नोंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून, मृत्यूमागील कारणांचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश दिलीप लोखंडे (वय ३४, रा. नवरेनगर, अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) हे कामानिमित्त रत्नागिरीत आले होते. त्यांनी शहरातील मारुती मंदिर परिसरातील संसारे कॉम्प्लेक्समधील आसरा लॉजमध्ये वास्तव्यासाठी खोली घेतली होती. दरम्यान, २३ जून रोजी सायंकाळी लॉजमधील रूम क्रमांक ११४ मध्ये ते बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तत्काळ त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात काही काळ हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी बीएनएसएस कलम १९४ अन्वये आमृ. क्रमांक ८०/२०२६ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

