(चिपळूण)
तालुक्यातील कळकवणे गावातील देऊळवाडी येथे ६५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घरातील शयनगृहात आढळून आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम कृष्णाजी शिंदे (वय ६५, रा. देऊळवाडी, कळकवणे, ता. चिपळूण) हे २३ जून रोजी सकाळी त्यांच्या घरातील शयनगृहात पाठ टेकून पडलेल्या अवस्थेत आढळले. त्यांचे पुत्र सुबोध दत्ताराम शिंदे यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच हात-पाय पूर्णपणे थंड पडलेले असून शरीर ताठरल्याची स्थिती होती. घटनेची माहिती मिळताच गावातील डॉ. सावंत यांना तातडीने घरी बोलावण्यात आले. त्यांनी तपासणी केल्यानंतर दत्ताराम शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
त्यानंतर अधिकृत वैद्यकीय पडताळणीसाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, दादर येथे नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तपासणी करून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेची नोंद बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू (आमृ.) क्रमांक १७/२०२६ म्हणून करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

