(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन अपर पोलीस अधीक्षक म्हणून बाबुराव महामुनी यांनी सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. माजी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पोलीस खात्यातील तीन दशके गाठणाऱ्या महामुनी यांचा प्रशासकीय आणि कायदा-सुव्यवस्थेचा व्यापक अनुभव आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी चंद्रपूर, नागपूर, सातारा आणि इचलकरंजी येथे यशस्वी कारकीर्द गाजवली आहे. त्यानंतर इचलकरंजीहून बढती मिळवून बुलढाणा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. रत्नागिरीत बदली झाल्यानंतर त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारताच जिल्ह्याच्या सामाजिक व गुन्हेगारी संदर्भातील सविस्तर माहिती घेऊन काम सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महामुनी यांच्या आगमनाने जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.