(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमरत्न फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘संगम ज्ञानाचा, वारसा गडाचा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना ‘किल्ले श्री प्रचितगड’ विषयक माहितीपर वह्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी साखरपा, देवरुख, संगमेश्वर आणि कडवई या चार केंद्रांवर होणार आहे.
संगमरत्न फाउंडेशनने गेल्या काही वर्षांत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच प्रचितगड संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. रक्तदान शिबिरे, वृद्धाश्रमांना साहित्य वाटप, प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण, वृक्षारोपण, मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण, विविध शैक्षणिक स्पर्धा, अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांना मदत, जनजागृती पदयात्रा, प्रेरणादायी व्याख्याने आणि प्रचितगड संवर्धनासाठी विविध उपक्रम संस्था सातत्याने राबवत आहे.
प्रचितगडाचा इतिहास, वारसा आणि संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वह्यांच्या मुखपृष्ठावर किल्ले श्री प्रचितगडाचे आकर्षक छायाचित्र असून, आतील पानांमध्ये गडाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि प्रमुख वास्तूंची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल कुतूहल निर्माण होण्याबरोबरच गडसंवर्धनाची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
सकाळी १०.०० वा. – जि.प. मराठी शाळा, साखरपा क्र. १
दुपारी १२.३० वा. – जि.प. मराठी शाळा, देवरुख क्र. ४
दुपारी ३.०० वा. – श्री छत्रपती राजा संभाजी विद्यालय, कसबा संगमेश्वर क्र. १
सायंकाळी ४.०० वा. – जि.प. मराठी शाळा, कडवई क्र. ४
या कार्यक्रमाला देणगीदार, इतिहासप्रेमी, समाजसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, गट शिक्षणाधिकारी, बीट विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रचितगडाचा इतिहास आणि संवर्धनाचा संदेश तालुकाभर पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि संगमेश्वरकरांकडून स्वागत होत असून, हा उपक्रम नव्या पिढीमध्ये वारसा संवर्धनाची भावना रुजविणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

