(संगमेश्वर / एजाज पटेल)
शून्य ते सहा वर्षे वयोगटातील लहान मुलांना गंभीर व जीवघेण्या रोगांपासून संरक्षण मिळावे म्हणून शासनाकडून विविध लसीकरण मोहीमा राबवल्या जातात. बीसीजी (BCG), हेपेटायटीस बी (Hepatitis B), पोलिओ, पेंटाव्हॅलेंट (PentaValent), डीपीटी (DPT) आणि एमएमआर (MMR) अशा लसी मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्यांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी मोफत पुरवल्या जातात.
परंतु फुणगूस येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा बेपर्वा आणि मनमानी कारभार उघडकीस आला आहे. डिंगणी गावातील पात्र मुलांचे लसीकरण करण्यासाठी डिंगणी बागवाडी शाळेत शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी १० ते संध्याकाळी ५ असा वेळ जाहीर असतानाही, आरोग्य सहाय्यक आणि सहायिका यांनी अवघ्या तीन-चार मुलांना लस देऊन दुपारपूर्वीच शिबीर गुंडाळले. त्यामुळे जवळपास ६-७ किलोमीटर अंतरावरून पायपीट करून आलेल्या पालकांना मुलांच्या लसीकरणाविना परत जावे लागले.
गंभीर आजार टाळण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून या लसी मोफत उपलब्ध करून देते. एवढेच नव्हे तर बालक एकाही लसीपासून वंचित राहू नयेत म्हणून सातत्याने जनजागृती मोहिमाही राबवली जाते. अशा वेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा म्हणजे शासनाच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनेची पायमल्लीच असल्याची ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच डिंगणी गावचे उपसरपंच आणि भाजप तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी पत्रकारांसह फुणगूस आरोग्य केंद्र गाठले. परंतु तेथे संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ सारवासारवीची उत्तरे मिळाल्याने, स्थानिक अधिकारीच मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
निकम यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांना या गलथान कारभाराची माहिती दिली. त्यावेळी डॉ. आठल्ये यांनी “लसीकरणाचे काम वेळेआधी थांबवणे चुकीचे आहे. याची गांभीर्याने चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल,” असे आश्वासन दिले.
“फुणगूस आरोग्य केंद्रातील कारभार म्हणजे ‘मी म्हणेन तीच पूर्वदिशा’ अशी परिस्थिती झाली आहे. अधिकारी स्वतःच मनमानी वागत असल्याने कर्मचाऱ्यांवर धाक उरलेला नाही. या सर्वामुळे रुग्ण जनतेलाच फटका बसतोय. आता या कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार उघड करून आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा मिथुन निकम यांनी दिला आहे.

