(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोकणच्या ग्रामीण भागात विविध कलाक्षेत्रांमध्ये अनेक प्रतिभावान कलाकार दडलेले आहेत. या कलाकारांची कला रसिकांसमोर आणण्यासोबतच त्यांना त्यांच्या क्षेत्रात योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुरत्नच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन सिंधुरत्न समितीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले.
संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलमधील कला विभागाने उभारलेल्या कलादालनाला डॉ. विनय नातू यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे, उदय करमरकर, बडद, सुवारे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी आणि कलेची विशेष आवड असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च कलाशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रशालेच्या कला विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे डॉ. नातू यांनी कौतुक केले. कलादालनातील विविध कलाकारांच्या कलाकृतींची त्यांनी बारकाईने पाहणी करून कलाकारांचे अभिनंदन केले.
यावेळी संगमेश्वरचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रथितयश चित्रकार कै. अरुण पाथरे यांच्या कलाकृती पाहून डॉ. नातू प्रभावित झाले. त्यांनी पाथरे यांच्या कलाकृतींविषयी आदर व्यक्त करत त्यांच्या कलाप्रवासाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
व्यापारी पैसा फंड संस्थेने ग्रामीण भागातील कला आणि बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला विषयाला दिलेले महत्त्व कौतुकास्पद आहे, असे सांगत डॉ. नातू यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले. तसेच पैसा फंड संस्थेच्या कला क्षेत्रातील योगदानाची सिंधुरत्नच्या माध्यमातून निश्चितच दखल घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते डॉ. विनय नातू यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशालेचा माजी विद्यार्थी चित्रकार हेमंत सावंत याने बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकासाठी चित्रे रेखाटल्याबद्दल त्याचाही धनंजय शेट्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी, सहशिक्षक विनोद ढोर्लेकर, सेवक अनंत जाधव आदी उपस्थित होते.

