(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर येथील प्रसिद्ध धारेश्वर धबधब्याकडे जाणारा मार्ग पावसाळी हंगामात सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी देवस्थान समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, पुढील तीन ते चार महिने पर्यटकांना या मार्गावर प्रवेश बंद राहणार आहे.
पावसाळा सुरू होताच मार्लेश्वर परिसर निसर्गसौंदर्याने नटतो. धुक्याच्या दुलईत हरवलेले डोंगर, हिरवाईने बहरलेला परिसर आणि उंच कड्यांवरून कोसळणारे शुभ्र धबधबे पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आणि भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होत असतात. विशेषतः धारेश्वर धबधबा हे या पर्यटनस्थळाचे प्रमुख आकर्षण मानले जाते. मात्र, मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याची शक्यता असते. अनेकदा पाण्याची पातळी क्षणार्धात धोकादायक बनत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर कोणतीही जीवितहानी अथवा अनुचित घटना घडू नये, यासाठी नदीपात्रातून धबधब्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे.
देवस्थान समितीने भाविक आणि पर्यटकांना धारेश्वर धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःची आणि कुटुंबियांची सुरक्षा प्रथम ठेवावी, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित पर्यटनासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असेही समितीने नमूद केले आहे. “श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा आणि पर्यटकाचा प्रवास सुरक्षित, सुखकर व संस्मरणीय व्हावा, हीच आमची भूमिका आहे. कृपया सुरक्षेच्या सूचनांचे पालन करून जबाबदार पर्यटनाचा आदर्श निर्माण करावा,” असे आवाहन श्री मार्लेश्वर देवस्थान समितीने केले आहे.

