(संगमेश्वर)
कोंड उमरे गावातील प्रविण जयराम जाधव यांच्या घराजवळ बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली असून सुदैवाने कुत्रा बिबट्याच्या तावडीतून बचावला आहे.
प्रविण जाधव हे सध्या मे महिन्याच्या सुट्टीसाठी गावी आले असून, त्यांच्या घराच्या अंगणात हा प्रकार घडला. पावसामुळे कुटुंबीय लवकर झोपायला गेले होते. मात्र सकाळी उठल्यानंतर परिसरात तोडफोड झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी घराजवळ लावलेले CCTV फुटेज तपासले असता बिबट्याचा कुत्र्यावर झडप घालण्याचा प्रयत्न त्यात स्पष्ट दिसून आला.
ही माहिती श्री. जाधव यांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. अमित (सुयोग) पवार यांना कळवली. रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने या भागात तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.