(संगमेश्वर / प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळावी आणि विविध जीवनोपयोगी कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेज ट्रस्ट इंग्रजी माध्यम शाळेत व्यावसायिक व कौशल्य शिक्षणांतर्गत ‘आर्ट अँड क्राफ्ट’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कला, हस्तकला, मूर्तिकला, संगीत आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रमांमधून आपल्या सृजनशीलतेचा प्रभावी आविष्कार सादर केला.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी मॅट रांगोळी, मोनो प्रिंट, कोलाज वर्क, वारली कला, ओरिगामी, मास्क निर्मिती, भरतकाम, कागदी फुले, गिफ्ट बॅग, शोभेच्या वस्तू, एब्स्ट्रॅक्ट आर्ट, पेपर कप आकाशकंदील, मेणबत्ती, दिवाळी पणत्या, फ्लॉवर पॉट, कार्टून पेंटिंग, पेपर गारलँड आणि पेट हाऊस अशा विविध कलाकृती साकारल्या. शाळेची माजी विद्यार्थिनी कु. मैथिली सुवारे हिने फ्लॉवर बास्केट, कोलाज आणि वारली कला यांची प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत ‘पक्षी घर निर्मिती’ हा विशेष उपक्रमही राबविण्यात आला. पक्षी अभ्यासक राजगोपाल पाटील यांनी पर्यावरणपूरक पक्षी घरांची संकल्पना समजावून सांगत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुतारकामाची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी लाकडी पक्षी निवारे तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
मूर्तिकला कार्यशाळेत दिलीप ठकार आणि सौ. दर्शना ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती तसेच विविध मातीच्या कलाकृती तयार केल्या. यंदाच्या कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या अम्ब्रेला पेंटिंग उपक्रमात विद्यार्थ्यांनी निसर्ग, फुले, पक्षी आणि वारली कलेवर आधारित आकर्षक चित्रे साकारून आपली कलात्मक प्रतिभा सादर केली.
याशिवाय तबला, हार्मोनियम आणि गायन कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांना संगीताची प्राथमिक ओळख करून देण्यात आली. शंकर चव्हाण, सौ. ओवी शेंबेकर आणि स्वामिनी मुणगेकर यांनी स्वर, लय, ताल आणि विविध वाद्यांची माहिती देत विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष सराव करून घेतला.
पूर्णपणे निःशुल्क आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी आवश्यक साहित्य शाळेतर्फे उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास, सौंदर्यदृष्टी, निरीक्षणशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि स्वावलंबन यांसारख्या गुणांचा विकास झाला. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे पालकांनीही विशेष कौतुक केले.

