(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील कळकदारा-ओझरे मार्गाची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेल्याने वाहतूक धोक्यात आली आहे. रस्ता दुपदरीकरणाच्या कामासाठी खोदण्यात आलेला आणि सध्या पर्यायी मार्ग म्हणून वापरात असलेला हा रस्ता काही ठिकाणी खचला असून, त्यामुळे मार्ग बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
निनावे ते ओझरे बुद्रुक दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. तसेच काही ठिकाणी मोऱ्यालगतचा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. अवघ्या पहिल्याच पावसात रस्त्याची ही अवस्था झाल्याने उर्वरित पावसाळ्यात काय परिस्थिती निर्माण होणार, असा सवाल नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक झाल्याने वाहनचालक भीतीच्या वातावरणात प्रवास करत आहेत. दुपदरीकरणाचे काम सुरू असताना संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांकडून आवश्यक खबरदारी का घेतली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या मार्गावरील परिस्थिती आणखी बिघडल्यास एसटी वाहतूकही बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणारे नागरिक तसेच रुग्ण यांचे मोठे हाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.
पहिल्याच पावसात रस्ता खचल्याने कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अवघ्या एक-दोन दिवसांच्या पावसात रस्त्याची अशी अवस्था होत असेल, तर उर्वरित पावसाळा हा रस्ता कसा तग धरणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून निकृष्ट कामासाठी जबाबदार अधिकारी अथवा ठेकेदारांवर कारवाई करावी, अशीही मागणी परिसरातून होत आहे.

