[ चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी ]
७० वर्षीय हृदयरुग्णाच्या उपचारानंतर आकारण्यात आलेल्या सुमारे १ लाख ४७ हजार रुपयांच्या बिलावरून निर्माण झालेल्या वादाला चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटल प्रशासनाने सविस्तर स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे. रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने वेळ न दवडता तातडीने उपचार सुरू करण्यात आले. रुग्णाचा जीव वाचविणे हेच डॉक्टरांचे पहिले कर्तव्य असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कळवंडे येथील ७० वर्षीय रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने अत्यंत गंभीर अवस्थेत अपरांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराच्या अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने नातेवाईकांच्या संमतीने तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्यानंतर रक्ताच्या गुठळ्या विरघळविण्यासाठी वापरले जाणारे Abbott कंपनीचे Inj. TENECTELEX 40 हे महत्त्वाचे इंजेक्शन देण्यात आले. एका इंजेक्शनची किंमत ₹५३,८२९.९२ असून, रुग्णाच्या प्रकृतीनुसार दोन इंजेक्शन्स देण्यात आल्याने केवळ या औषधासाठीच ₹१,०७,८५९.८४ खर्च झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यानंतर रुग्णावर सुमारे ३६ तास अतिदक्षता विभागात (ICU) उपचार करण्यात आले. विविध तपासण्या, औषधे, उपचार साहित्य आणि आयसीयू सेवेचा खर्च मिळून एकूण बिल सुमारे ₹१.४७ लाख झाले. मात्र, या बिलामध्ये रुग्णालयाचे प्रत्यक्ष सेवा शुल्क केवळ ₹२० ते ₹२२ हजारांच्या आसपास असून, उर्वरित रक्कम महागडी औषधे आणि उपचारासाठी वापरलेल्या साहित्याची असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
गंभीर अवस्थेतील रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांसमोर सर्वात मोठे आव्हान हे वेळेशी असते. अशा वेळी खर्चाची सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ घालविण्यापेक्षा तातडीने उपचार सुरू करणे गरजेचे असते. घरातील निर्णय घेणारी व्यक्ती त्याच क्षणी उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचविण्याला प्राधान्य देत उपचार सुरू करण्यात आल्याचे रुग्णालयाने निवेदनात नमूद केले आहे. विशेष म्हणजे, उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णालयाने कोणतेही डिपॉझिट किंवा आगाऊ रक्कम मागितली नव्हती, असा दावा प्रशासनाने केला आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतरही रक्कम जमा करून घेण्याआधी रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यात आली. त्यानंतर पुढील अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसाठी डेरवण येथील रुग्णालयात रुग्णाला हलविण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, रुग्ण दाखल होताना आणि उपचारानंतर करण्यात आलेल्या ईसीजी अहवालांमध्ये प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून येते. उपचाराच्या बिलावरून निर्माण झालेल्या वादामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची झाल्याची खंतही रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली आहे. गंभीर रुग्ण समोर असताना प्रथम जीव वाचवायचा की उपचार सुरू करण्यापूर्वी खर्चाची चर्चा करून नातेवाईकांच्या निर्णयाची प्रतीक्षा करायची? असा प्रश्न या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रासमोर उभा राहिल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. रुग्णालयाने उपचारात कोणतीही निष्काळजीपणा झालेला नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. रुग्णाला विलंब न लावता उपचार देण्यात आले, डिपॉझिटची अट घालण्यात आली नाही आणि प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील उपचारांसाठी रुग्णाला हलविण्यात आले, असा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच हॉस्पिटलच्या सेवा शुल्कामध्ये आवश्यक ती सवलत देण्याची तयारी व्यवस्थापनाची होती आणि यापुढेही राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

