(संगमेश्वर / प्रतिनिधी )
डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा (ईएनटी) विभागातर्फे मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरासाठी रुग्णांची नावनोंदणी सुरू झाली आहे. कान, नाक आणि घशाच्या विविध आजारांनी त्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनी प्राथमिक तपासणी करून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
या शिबिरात नाकाच्या हाडावरील शस्त्रक्रिया, सायनस ऑपरेशन, कानाच्या पडद्याची व कानाच्या हाडाची शस्त्रक्रिया, टॉन्सिल व ॲडेनॉईड शस्त्रक्रिया, अश्रूपिशवी (Lacrimal Sac), लाळ ग्रंथी तसेच थायरॉईडवरील शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.
शस्त्रक्रियेसाठी इच्छुक रुग्णांनी प्रथम वालावलकर रुग्णालयाच्या ईएनटी विभागात प्राथमिक तपासणी करून आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करत नावनोंदणी करावी, असे आवाहन ईएनटी सर्जन डॉ. प्रतीक शहाणे यांनी केले आहे.
वालावलकर रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना तसेच इतर विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नियमितपणे मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केली जातात. या योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील अनेक रुग्ण कान, नाक व घशाच्या आजारांकडे दुर्लक्ष करतात. योग्य वेळी उपचार आणि शस्त्रक्रिया झाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते. त्यामुळे अशा आजारांनी त्रस्त असलेल्या सर्व गरजू रुग्णांनी या मोफत ईएनटी शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

