(देवरूख / वार्ताहर)
मराठी शाळेत शिकत असतानाच मृण्मयीला हॉकी खेळाची आवड निर्माण झाली. मोठेपणी याच खेळात करिअर करून नाव कमवायचे, अशी स्वप्ने डोळ्यांत घेऊन कायम सकारात्मक विचार करणाऱ्या देवरूख बागवाडी येथील मृण्मयी योगेश कुलकर्णी हिची दोन वर्षांची दुर्धर आजाराशी सुरू असलेली झुंज अखेर गुरुवारी संपली. अवघ्या १४व्या वर्षी मृण्मयीने जगाचा निरोप घेतल्याने देवरूख शहरावर शोककळा पसरली असून, तिच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृण्मयी ही देवरूख बागवाडी येथील पौरोहित्य करणारे योगेश कुलकर्णी यांची कन्या. लहानपणापासूनच हुशार, मनमिळाऊ आणि विविध शालेय उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणारी विद्यार्थीनी म्हणून तिची ओळख होती. देवरूख शाळा क्रमांक ३ मध्ये शिक्षण घेत असताना तिला हॉकी खेळाची गोडी लागली. तिने या खेळाचा मनापासून सराव केला आणि तालुका तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही सहभाग नोंदवला.
त्यानंतर सातवी इयत्तेत मृण्मयीने न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख येथे प्रवेश घेतला. शिक्षणासोबतच चित्रकला, नृत्य, खो-खो यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये ती सातत्याने सहभागी होत असे. अभ्यासातही ती हुशार होती. त्यामुळे क्रीडा, कला आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची तिची धडपड सुरू होती.
‘रुद्र’ केला मुखोद्गत
मृण्मयीचे वडील योगेश कुलकर्णी हे त्यांचा मुलगा यश याला पौरोहित्यातील रुद्र शिकवत असताना मृण्मयीही ते लक्षपूर्वक ऐकत असे. ऐकता ऐकता तिने रुद्र मुखोद्गत केला होता. तिच्या या विलक्षण स्मरणशक्तीचे आणि बुद्धिमत्तेचे परिसरात कौतुक होत असे.
स्वभावाने अत्यंत प्रेमळ आणि मनमिळाऊ असलेली मृण्मयी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी आपुलकीने वागत असे. परिसरातील विविध कार्यक्रमांमध्ये तिचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. त्यामुळे कमी वयातच तिने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.
२०२४ मध्ये सुरू झाली आजाराशी झुंज
मे २०२४ मध्ये मृण्मयीला पोटदुखी आणि पचनाच्या त्रासाने सुरुवात झाली. वैद्यकीय तपासण्या सुरू असताना तिच्या मेंदूमध्ये गाठ असल्याचे निदान झाले. गाठ काढण्यासाठीची शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. मात्र या कठीण परिस्थितीतही मृण्मयीने धैर्य सोडले नाही.
‘मला बरे करा, गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करा, मी उपचारांना साथ देईन’ असा आत्मविश्वास तिने डॉक्टरांसमोर व्यक्त केला. तिच्या या जिद्दीला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांनी साथ दिली. तब्बल १२ तासांची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
या काळात मृण्मयीच्या उपचारांसाठी देवरूख परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनीही पुढाकार घेत आर्थिक मदत केली. नागरिकांचे आशीर्वाद आणि उपचारांनंतर काही महिन्यांतच मृण्मयी पूर्वीसारखी बरी होऊ लागली. ती पुन्हा शाळेत जाऊ लागली आणि अभ्यासात रमू लागली.
पुन्हा आजार बळावला, तरीही जिद्द कायम
मात्र वर्षभरातच तिच्या पाठीत आणि खांद्यामध्ये वेदना सुरू झाल्या. वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर पूर्वीच्या आजाराशी संबंधित गंभीर बाब समोर आली. मेंदूतील गाठीतील आजारग्रस्त आणि घातक पेशी मणक्यांपर्यंत पोहोचल्याचे आणि मेंदूतील गाठीचा आजारही मणक्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले
त्यानंतर मृण्मयीवर केमोथेरपी, रेडिएशन आणि इतर उपचार सुरू झाले. मात्र या कठीण काळातही तिचा एकच ध्यास होता, ‘मला कसेही करून बरे व्हायचे आहे.’ डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांना ती सकारात्मक प्रतिसाद देत राहिली.
गेल्या पुढे दोन महिन्यांत मात्र तिची प्रकृती अधिक खालावत गेली. दुर्धर आजाराशी लढताना तिच्या जिद्दीचे डॉक्टरांकडूनही कौतुक होत होते. दोन वर्षांच्या या संघर्षातील सुमारे एक वर्ष तिने रुग्णालयात उपचार घेतले. या काळात आई-वडील, भाऊ, काका-काकू आणि चुलत बहिणींनी तिच्या सोबत राहून तिला मानसिक आधार दिला.
मोठी स्वप्ने होती, पण नियतीने साथ सोडली
गुरुवारी रात्री मृण्मयीची आजाराशी सुरू असलेली प्रदीर्घ झुंज अखेर संपली. अवघ्या १४व्या वर्षी तिचे निधन झाले. मृण्मयीच्या निधनाचे वृत्त देवरूखमध्ये समजताच अनेकांचे डोळे पाणावले. तिच्या शाळेतही श्रद्धांजली वाहून तिच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
हॉकीमध्ये करिअर करून नाव कमावण्याचे मृण्मयीचे स्वप्न होते. आयुष्यात मोठे काहीतरी करण्याचा आत्मविश्वासही तिच्यात होता. एका दुर्धर आजाराशी दोन वर्षे धैर्याने सामना करणाऱ्या या चिमुकलीने उपचारांदरम्यान केव्हाही जगण्याची आशा सोडली नाही. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते.
मृण्मयीच्या अकाली निधनाने देवरूखवासीयांवर शोककळा पसरली असून, एका गुणी आणि होतकरू मुलीचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृण्मयीच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका-काकू आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

