(राजापूर /रत्नागिरी)
सामाईक बागेतील साफसफाईवरून भावांमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन एका ६१ वर्षीय व्यक्तीला भावाने कोयतीने मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील विलये मिराशीवाडी येथील डोंगर तिठा परिसरात घडली. भावजयनेही कोयतीने पायाच्या पोटरीवर वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेश धोंडू तावडे (७२) आणि सुहासिनी सुरेश तावडे (६०) यांच्याविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, नामदेव धोंडू तावडे (६१) हे ७ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीडच्या सुमारास सर्वेश संतोष परवडी यांच्यासोबत सामाईक जागेतील डोंगर तिठा येथील बागेत साफसफाई करून घरी परतत होते. त्यावेळी त्यांचा भाऊ सुरेश आणि भावजय सुहासिनी हे दोघे त्यांना शिवीगाळ करीत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यानंतर सुरेश तावडे यांनी नामदेव यांना जवळ बोलावले. तेथे गेल्यानंतर ‘तू या बागेत पाऊल टाकायचे नाही’ असे सांगत त्यांना ‘चोर’ म्हणून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. वाद वाढल्यानंतर सुरेश आणि सुहासिनी यांनी नामदेव यांच्या हातातील पिशवी ओढून घेत त्यातील दोन कोयत्या काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादीच्या आरोपानुसार, सुरेश तावडे यांनी त्यांना एका हाताने पकडले, तर सुहासिनी यांनी कोयतीने त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीवर वार केला. त्यामुळे नामदेव खाली कोसळले. त्यानंतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या छातीवर आणि पाठीवर लाथा मारल्याचा आरोप आहे. याचदरम्यान नामदेव खाली पडलेले असताना सुरेश तावडे यांनी त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला कोयतीने मारून दुखापत केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीनंतर सुरेश तावडे यांनी ‘ही आमची बाग आहे. तुझे इथे काही नाही. तू खाली जा,’ असे म्हणत दमदाटी केल्याचा आरोप आहे. तसेच पुन्हा बागेत आल्यास तंगड्या तोडून टाकण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी नामदेव धोंडू तावडे यांच्या फिर्यादीवरून राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २००/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील संबंधित कलमांनुसार सुरेश धोंडू तावडे आणि सुहासिनी सुरेश तावडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, याच कुटुंबातील सामाईक जमीन आणि घराच्या वादातून यापूर्वीही तक्रार दाखल झाल्याची नोंद असल्याने या प्रकरणातील पुढील पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.

