(फुणगूस / एजाज पटेल)
नियतीचा खेळ किती निर्दयी असू शकतो, याचा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव रत्नागिरी तालुक्यातील देऊड गावाने मंगळवारी घेतला. घरासमोरील गाडीच्या शेडमधील हॅलोजन बल्ब बदलताना विजेचा जोरदार धक्का बसून अवघ्या १९ वर्षीय जयराज संजय देसाई या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने देसाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण देऊड गाव शोकसागरात बुडाले आहे.
मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. घराशेजारील शेडमधील चालू विद्युत लाईनवरील हॅलोजन बल्ब बदलण्यासाठी जयराजने हात लावला. मात्र, विजेचा प्रवाह सुरू असल्याची कल्पना नसल्याने त्याला तीव्र विद्युत धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तत्काळ त्याला जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
जयराज सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. अत्यंत हुशार, अभ्यासू आणि शांत स्वभावाचा म्हणून तो परिसरात ओळखला जात होता. उच्च शिक्षण घेऊन आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करायचे, कुटुंबाला आधार द्यायचा आणि आयुष्यात मोठे काहीतरी करून दाखवायचे, अशी अनेक स्वप्ने त्याने डोळ्यांत साठवली होती. मित्रमंडळींमध्ये तो अत्यंत प्रेमळ आणि मदतीला धावून जाणारा म्हणून लोकप्रिय होता.
हसतमुख, मनमिळावू आणि स्वप्नांनी भरलेला जयराज एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंतिम दर्शनावेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांच्या अश्रूंना बांध फुटला होता. “नेहमी हसत राहणारा आमचा जयराज आम्हाला असा अचानक सोडून जाईल, यावर अजूनही विश्वास बसत नाही,” अशा भावना त्याच्या मित्रांनी व्यक्त केल्या.
एका उमद्या, गुणी आणि भविष्याची मोठी स्वप्ने पाहणाऱ्या तरुणाचा झालेला हा दुर्दैवी अंत देऊड गावासाठी कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण करून गेला आहे.

