(संगमेश्वर)
मुंबई-गोवा महामार्गावर आरवली (ता. संगमेश्वर) येथे रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला. गुहागरहून प्रवासी सोडून परत येत असलेली मिनी बस (क्रमांक MH 04 LY 6676) भरधाव वेगाने कारवर आदळल्याने चार जण गंभीर जखमी झाले. यात दोन महिलांसह दोन लहान मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बस चालक रवी अरुण झाल्टे याचे आरवलीजवळील पेट्रोल पंपाशेजारील अवघड वळणावर बसवरील नियंत्रण सुटले. दुभाजकावर आदळल्यानंतर बस थेट पंक्चर काढणाऱ्या दुकानात घुसली. त्याचवेळी दुकानाबाहेर उभी असलेली मारुती व्हॅगनआर (MH 02 BJ 1512) या बसच्या जोरदार धडकेत चेंगराचूर झाली.

कारमध्ये कल्पेश घडशी (32), रुद्रा रुपेश घडशी (29), ऋग्वेद कल्पेश घडशी (5) आणि कियारा रुपेश घडशी (3) हे बसलेले होते. ते सर्वजण गणेशोत्सवासाठी आंबव पोंक्षे या मूळ गावी आले होते. अंत्रवली येथे नातेवाईकांकडे जात असताना कारला पंक्चर झाल्यामुळे ते पेट्रोल पंपाजवळ थांबले होते. दुर्दैवाने त्याचवेळी हा अपघात घडला.
अपघातानंतर चालक व त्याचा सहकारी जंगलात पळून गेले. मात्र बसमध्ये चालकाचा परवाना पोलिसांच्या हाती लागला आहे. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक साळवी व पोलिस कर्मचारी सोमनाथ खाडे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
याबाबत स्थानिक नागरिकांनी आरोप करत म्हटले आहे की, महामार्गावर चेक नाके व वाहतूक नियंत्रण व्यवस्था नसल्याने अशा घटना घडत आहेत. तसेच वाहनांची योग्य तपासणी न झाल्यामुळे मद्यधुंद व बेजबाबदार चालक रस्त्यावर गाड्या चालवत आहेत.

