(संगमेश्वर / एजाज पटेल)
पूर्वी ग्रामीण भागातील शाळांमध्ये झाडे लावली जात असत. मात्र, दिवसेंदिवस शाळेमध्ये झाडे लावण्याच्या प्रमाणात घट होत असून शाळेतील परिसर भकास होण्यास प्रारंभ झालेला आहे. असे असताना संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे मणवेवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शिक्षकांनी व लहान चिमुकल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी वृक्षप्रेम जागृत करत विविध प्रकारच्या भाज्या, फळ आणि फुलझाडांची लागवड केल्याने शाळेच्या परिसराला नवीनच आयाम मिळाले आहे.
येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाळेच्या परसबागेत रसयान विरहित विविध प्रकारच्या सेंद्रिय भाजीपाला लागवड केली आहे. विशेष म्हणजे या भाजीपाल्याचा उपयोग शालेय पोषण आहारात केला जात आहे. शुद्ध आणि गावरान भाजीपाला असल्याने ती विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी आहे. यात कोणत्याही रासायनिक खतांचा वापर आणि औषध फवारणी केली जात नाही. सेंद्रिय खतांचा भाजीपाला लागवडीसाठी वापर केला आहे, असे शाळेचे मुख्याध्यापक गजानन स. सावंत तसेच अनिल जाधव, विकास वाडकर आणि संदीप कुंभार यांनी सांगितले. शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून सुमारे 27 विध्यार्थी पटसंख्या आहे.
बाजारातील हायब्रीड भाजीपाला न आणता विद्यार्थ्यानी परसबागेत फुलविलेला आहे. ताजा टवटवीत भाजीपाला दररोज पोषण आहारात वापरला जात आहे. यामुळे साहजिकच आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, असे शाळेचे शिक्षक सांगतात. एवढेच नव्हे रसायनविरहित भाज्या लागवडीचे संस्कार विद्यार्थ्यांवर होत असल्याने या शाळेचा परसबागेचा उपक्रम आदर्श उदाहरण ठरणार आहे.
दुर्गम भाग आणि डोंगरावर असणाऱ्या या शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून दिलेले शिक्षण अधिक प्रभावी ठरते. यासाठी येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित कृतीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना एकत्र करून विविध भाजीपाला लागवडीसाठी बियाणे तसेच तयार रोपे आणण्यात येते. टोमॅटो, चवळी,पावठा, गवार, फ्लावर, कोबी, कोथिंबीर, मेथी आदी पालेभाज्यांची शाळेच्या आवारातच लागवड करून जमीन मशागतीपासून भाजी लागवड ते भाजी उगवल्यानंतर त्या काढेपर्यंत सर्व प्रक्रिया शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वतः करत आहेत.
शाळेच्या आवारात पेरू, केळी, काजू, फणस, पपईची झाडे सुद्धा लावण्यात आली असून केळी आणि पपईची झाडे फळांनी चांगलीच बहरली आहेत. गावठी केळी आणि पपई विद्यार्थ्यांनाच खायला दिली जातात, असे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
सरकारी शाळांमध्ये परिसराच्या देखभाल व सौदर्गीकरणाकडे दुर्लक्ष होत चाललेले आहे. अशात असुर्डे येथील मणवेवाडी शाळेतील शिक्षकांनी या गोष्टीवर विचार करून विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरणाची निर्मीती करण्यासाठी भाजीपाला, फळ आणि फुलझाडांची लागवड करून शाळेतील सौंदर्यात भर घालण्याचे कार्य केलेले आहे. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पटांगणात प्रवेश करताच विविध प्रकारची फुलझाडे मन आकर्षित करून घेतात. फुलांमधून येणार सुगंध, फुलपाखरांसह विविध पक्ष्यांचे दर्शनही होऊ लागले आहेत. ही हिरवीगार परसबाग पाहण्यासाठी शिक्षणविस्तार अधिकारी त्रिभुवणे यांनी भेट देऊन शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे कौतुक केले.