(राजापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्याचा भौगोलिक विस्तार आणि वाढती प्रशासकीय गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर कार्यालय स्थापनेची पुढील प्रक्रिया सुरू झाली असून, हरकती व सूचना मागविण्यासाठी शासनाने जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे रायपाटण परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महसूल व वन विभागाच्या दि. 2 एप्रिल 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात मौजे रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर दि. 23 जून 2026 रोजी शासनाने पत्र जारी करून कार्यालयाच्या निर्मितीसंदर्भात जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचे तसेच नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याचे निर्देश दिले आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी, राजापूर यांच्यामार्फत रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापनेचा मसुदा जाहीर करण्यात येणार आहे. या प्रस्तावाचा परिणाम होणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींना माहिती मिळावी, यासाठी ही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात काही महसूल मंडळांचा समावेश करण्यात येणार असून, उर्वरित मंडळे पूर्वीप्रमाणे राजापूर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच राहतील.
या मसुद्याबाबत कोणाला हरकत किंवा सूचना असल्यास, जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून पुढील 15 दिवसांच्या आत (कार्यालयीन सुट्ट्यांसह) त्या उपविभागीय अधिकारी, राजापूर किंवा तहसीलदार, राजापूर यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात. मुदत संपल्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवांसाठी राजापूरपर्यंत वारंवार जावे लागणार नाही. त्यामुळे स्थानिकांना अधिक सुलभ आणि जलद प्रशासकीय सेवा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

