(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी-३ पदाच्या पदोन्नतीची बहुप्रतीक्षित प्रक्रिया सोमवारी (२२ जून) अखेर पूर्ण करण्यात आली. शिक्षक संघटना आणि केंद्रप्रमुख संघाकडून तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले असतानाही प्रशासनाने अंतिम यादीच्या आधारे समुपदेशन प्रक्रिया राबवत पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला.
विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी-३ या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड यादी तयार करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त हरकतींचा विचार करून तसेच शिक्षकांच्या प्रस्तावांची सखोल पडताळणी केल्यानंतर अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी ही यादी संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचना नऊही तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे दिल्या होत्या. मात्र, पदोन्नती प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाने या प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप उपस्थित केले होते. केंद्रप्रमुखांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) लागू आहे अथवा नाही, याबाबत राज्य शासनाकडून स्पष्ट मार्गदर्शन मागवून तोपर्यंत पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली होती.
याशिवाय विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पदोन्नती प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी केली होती. तथापि, या मागण्यांकडे प्रशासनाने फारसे लक्ष न देता अंतिम यादीच्या आधारे समुपदेशन प्रक्रिया पार पाडली आणि विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी-३ पदावरील पदोन्नतीची प्रक्रिया पूर्णत्वास नेली. या निर्णयामुळे शिक्षक संघटनांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत असून, केंद्रप्रमुखांच्या टीईटी पात्रतेच्या प्रश्नावर राज्य शासनाची भूमिका काय राहणार, याकडे आता शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

