(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या संगमेश्वर एस.टी. बसस्थानकाची पावसाळ्यात अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. पावसाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण स्थानक आवारात चिखलाचे साम्राज्य पसरले असून, प्रवाशांना चिखलातून वाट काढत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या निकृष्ट नियोजनामुळे निर्माण झालेल्या या समस्येमुळे महिला, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दोन वर्षांपासून कायम समस्या; पाण्याच्या निचऱ्याचे नियोजनच नाही
सोनवी पुलाच्या कामादरम्यान एस.टी. बसस्थानकासमोर सेवा रस्ता तयार करण्यात आला. मात्र, रस्त्याचे बांधकाम करताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक गटारे किंवा जलनिस्सारण व्यवस्था करण्यात आली नाही. रस्त्यालगत असलेल्या डोंगराळ भागातून येणारे पावसाचे पाणी थेट सेवा रस्त्यावरून वाहत बसस्थानकाच्या आवारात शिरते. परिणामी गेली दोन वर्षे पावसाळ्यात बसस्थानक चिखलाने भरून जात आहे. सेवा रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही नागरिकांच्या पदरी मात्र गैरसोयच आली आहे.
महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक परिस्थिती
संगमेश्वर हे तालुक्यातील मध्यवर्ती बसस्थानक असल्याने ग्रामीण भागातून दररोज मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक येथे ये-जा करतात. मात्र, स्थानक परिसरात सर्वत्र चिखल आणि पाणी साचल्याने प्रवाशांना उभे राहण्यासाठीही सुरक्षित जागा उरलेली नाही. शालेय विद्यार्थी दप्तराचे ओझे घेऊन बस पकडण्यासाठी धावपळ करताना घसरून पडण्याचा धोका वाढला आहे. निसरड्या चिखलामुळे ज्येष्ठ नागरिकांना चालणेही कठीण झाले असून, एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाहनांच्या चिखलफेकीमुळे प्रवाशांचा संताप
स्थानक आवारात साचलेल्या चिखलातून एस.टी. बस आणि इतर वाहने वेगाने जात असताना चिखलमिश्रित पाणी थेट बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर उडते. त्यामुळे कपडे खराब होत असून, विशेषतः महिला व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारावरून चालक आणि प्रवाशांमध्ये वारंवार वादही होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
नागरिकांचा संतप्त सवाल
सर्वसामान्यांच्या करातून उभारल्या जाणाऱ्या विकासकामांमध्ये इतकी निष्काळजीपणा का? दोन वर्षांनंतरही सेवा रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना का करण्यात आलेल्या नाहीत? एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. स्थानिकांनी तातडीने जलनिस्सारणाची व्यवस्था करून बसस्थानक परिसरातील चिखलमुक्तीची मागणी केली आहे.

