(संगमेश्वर / एजाज पटेल)
नवीन सोनवी पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अवघ्या महिन्याच्या आतच आज मंगळवारी सकाळी पहिला भीषण अपघात घडला. एकाच मार्गिकेतून सुरू असलेल्या दोन्ही बाजूंच्या वाहतुकीदरम्यान आयशर ट्रक (एमएच ५१ सी ३१३२) आणि कंटेनर (एमएच २३ एयू ६३५८) यांची पुलावर समोरासमोर जोरदार धडक झाली. या घटनेनंतर संबंधित ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियोजनावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मोठ्या आवाजाने परिसर हादरला
मंगळवारी सकाळी वाहतूक सुरू असताना पुलाच्या दिशेने मोठा आवाज झाल्याने एसटी स्थानक परिसरातील प्रवासी, चालक-वाहक आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावले. तेव्हा पुलाच्या मध्यभागी दोन अवजड वाहने समोरासमोर धडकल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
अर्धवट कामातच वाहतूक सुरू
स्थानिकांच्या मते, गोव्याच्या दिशेची एक मार्गिका घाईघाईने पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली, तर मुंबईच्या दिशेची मार्गिका अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे सध्या एकाच मार्गिकेतून मुंबई आणि गोवा या दोन्ही दिशांची वाहतूक सुरू आहे.
याशिवाय हा पूल तीव्र वळणाचा असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज चालकांना वेळेवर येत नाही. अशा परिस्थितीत एकाच मार्गिकेतून अवजड वाहनांची दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याने अपघाताचा धोका वाढल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. पुलावर आवश्यक दिशादर्शक फलक, वेगमर्यादा नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था आणि अन्य सुरक्षाविषयक उपाय अपुरे असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
वाहतूक कोंडी; पोलिसांची तातडीची कारवाई
अपघातानंतर दोन्ही वाहने पुलाच्या मध्यभागी अडकल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
तीघे किरकोळ जखमी
या अपघातात झेवियर अल्वेरीस (३१), शहीद पानाडी (२३) आणि सुरेश बांगर (३२) हे तिघे किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी सोडले.
सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल नव्हता
या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असला, तरी मंगळवारी सायंकाळपर्यंत संगमेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.
नवीन पूल सुरू झाल्यानंतर महिन्याच्या आतच झालेल्या या अपघातामुळे पुलावरील वाहतूक व्यवस्थेचा फेरआढावा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबई मार्गिकेचे काम तातडीने पूर्ण करावे किंवा तोपर्यंत एकमार्गिकेवरील वाहतुकीसाठी अधिक प्रभावी सुरक्षाव्यवस्था आणि वेग नियंत्रणाची उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

