(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
शासनाच्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या विशेष अभियानांतर्गत दिनांक 26 सप्टेंबर रोजी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे महिला व बालकांसाठी आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या उपक्रमाचा उद्देश महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा व जनजागृती हा होता.
शिबिरात रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग, दंतरोग, गर्भाशयमुख व मुख कर्करोग, क्षयरोग, ॲनिमिया, सिकलसेल आजार तपासणीसह गर्भवतींची प्रसूतीपूर्व तपासणी व लसीकरण करण्यात आले. तसेच हिमोग्लोबिन तपासणी, पोषण सल्ला, योगाभ्यास, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आयुष्मान भारत व सिकलसेल कार्ड नोंदणी, रक्तदान शिबिर अशा विविध सेवा पुरवण्यात आल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन कसबा सरपंच पूजा लाणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संगमेश्वर लायन्स क्लबचे अध्यक्ष रविकांत शिंदे, विविध मान्यवर डॉक्टर व सहकारी उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांनी विशेष भेट देऊन आरोग्य शिबिराचा आढावा घेतला व लाभार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्यासह पूजा शेखर निकम यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
शिबिर यशस्वी होण्यासाठी संगमेश्वर बाजारपेठ व्यापारी, डॉक्टर प्रदीप खातो, पंकज संसारे (सोळजाई लॅब), अवधूत जोशी (डायमंड डिस्ट्रिक), वैद्यकीय स्टोअर्स, संगमेश्वर तालुका मेडिकल असोसिएशन, प्रशांत यादव (वाशिष्टी दुग्ध संघ, चिपळूण), तसेच तालुका भाजप प्रमुख श्री. कोळेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
या शिबिराचा लाभ एकूण 705 नागरिकांनी घेतला असून यात स्त्रिया, पुरुष आणि किशोरवयीन मुलींचा समावेश होता.

