(देवळे / प्रकाश चाळके)
आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी शासनाने पीक विमा योजना राबवली आहे. मात्र, प्रत्यक्षात विमा भरूनही अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षाचा विमा अद्याप मिळालेला नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा बँक किंवा वित्तीय संस्थांमार्फत उतरवला जातो. तरीही काही शेतकऱ्यांना भरलेला विमा मिळालेला नाही. त्यामुळे “जबाबदार कोण – बँक की विमा कंपनी?” असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
या प्रकारामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण असून बँक आणि विमा कंपनीच्या दिरंगाईचा थेट फटका त्यांना बसत आहे. विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार बँक आणि विमा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी ठोस उत्तर मिळत नसून जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
देवळे येथील शेतकरी अनिल शिर्के यांनी सांगितले की, “मी बँक आणि विमा कंपनीकडे अनेक वेळा पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. सहा ते सात महिन्यांपासून सतत विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, विमा मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शनही दिले जात नाही.”
जिल्ह्यातील सुमारे २०० ते २५० शेतकरी विमा रकमेपासून वंचित असल्याची माहिती पुढे येत असून, या प्रश्नावर न्याय कुठे मागावा, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

