(संगमेश्वर / प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित युनायटेड इंग्लिश स्कूल च्या पंचकोशाधारित युनायटेड गुरुकुल विभागात एक आगळीवेगळी आणि प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. गेली सलग तीन शैक्षणिक वर्षे अमेरिकेत वास्तव्यास असलेली आर्या ही विद्यार्थिनी थेट अमेरिकेतून भारतात येऊन गुरुकुलच्या दैनंदिन कामकाजात पूर्णवेळ सहभागी होत आहे.
अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पाच कोशांच्या संकल्पनेवर आधारित गुरुकुल पद्धतीतून विद्यार्थ्यांचा समतोल आणि मूल्याधिष्ठित विकास साधण्याचा प्रयत्न येथे केला जातो. भारताच्या प्राचीन शिक्षण पद्धतीचा अंगीकार करत संस्कार, संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन करताना आधुनिक कौशल्ये, विज्ञान-तंत्रज्ञान, मैदानी खेळ आणि जीवनकौशल्य यांचा समन्वय साधला जातो. दिवसाला सुमारे अकरा तास आणि वर्षातून जवळपास २६० दिवस चालणाऱ्या या गुरुकुल शिक्षणप्रणालीमुळे हा विभाग शिक्षणक्षेत्रात विशेष लक्ष वेधून घेत आहे.
या गुरुकुलमध्ये सकाळची उपासना, प्रार्थना, व्यायाम, योगासने यानंतर संगणक शिक्षण, दैनंदिन अध्ययन, संगीत, हस्तकौशल्य यांसारखे उपक्रम नियमितपणे घेतले जातात. त्याचबरोबर भात लावणी, आषाढी एकादशी, गणेशमूर्ती निर्मिती, निवासी शिबिरे अशा सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्येही विद्यार्थी प्रत्यक्ष सहभाग घेतात. या सर्व उपक्रमांमध्ये अत्यंत मनापासून सहभागी होणारी विद्यार्थिनी म्हणजे आर्या.
नववीत शिक्षण घेणारी आर्या ही शिकागो येथे वास्तव्यास आहे. तिची आई सौ. संपदा या युनायटेड इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थिनी असून, सॉफ्टवेअर इंजिनिअर रोहित यांच्याशी विवाहानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. पाश्चात्य अभ्यासक्रमात शिक्षण घेत असताना आर्याला भारतीय संस्कृती, मूल्ये आणि भारतातील शिक्षणपद्धती प्रत्यक्ष अनुभवता यावी, या उद्देशाने सौ. संपदा गेली तीन वर्षे आपल्या मुलीला युनायटेड गुरुकुल विभागात पाठवत आहेत. अमेरिकेतील शाळेला सुट्टी मिळाल्यावर आर्या आवर्जून भारतात येते आणि गुरुकुलमध्ये पूर्णवेळ उपस्थित राहते.
आजच्या काळात पाश्चात्य जीवनशैलीचे अनुकरण सहज होत असताना, परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलीला भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी गुरुकुल शिक्षणाची निवड करणारी आई आणि त्या निर्णयाला तितक्याच सकारात्मकतेने स्वीकारणारी आर्या, हे दोघीही निश्चितच कौतुकास्पद आणि इतर पालकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.
युनायटेड गुरुकुल विभागात आर्यासारख्या विद्यार्थिनीचा सहभाग हा भारतीय शिक्षणपद्धतीची जागतिक स्तरावरील उपयुक्तता अधोरेखित करणारा असून, संस्काराधिष्ठित शिक्षणाची गरज आजही किती महत्त्वाची आहे, हे ठळकपणे दाखवून देणारा आहे.

