(लांजा/ रत्नागिरी प्रतिनिधी)
भारतीय संविधान, संविधान निर्मिती प्रक्रिया आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबाबत समाजात गैरसमज निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचा आरोप करत आंबेडकरी व संविधानवादी कार्यकर्त्यांनी लांजा तहसीलदारांकडे निवेदन सादर करून संबंधित प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अलीकडे झालेल्या एका पत्रकार परिषदेत श्री. प्रमोद जठार यांनी अनुच्छेद ३७० संदर्भात “जे नेहरूंना जमले नाही, जे संविधानकर्त्यांना जमले नाही ते मोदींनी करून दाखवले” असे वक्तव्य केल्याची व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या वक्तव्यामुळे भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया, संविधान सभेचे कार्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक योगदानाविषयी चुकीची धारणा निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अनुच्छेद ३७० हे भारतीय संविधानातील तात्पुरत्या स्वरूपाचे घटनात्मक प्रावधान होते. त्याच्या उप-अनुच्छेद (३) मध्ये राष्ट्रपतींना घटनात्मक प्रक्रियेद्वारे ते निष्क्रिय अथवा रद्द करण्याची तरतूद आधीपासूनच करण्यात आली होती. त्यामुळे अनुच्छेद ३७० ची निर्मिती आणि त्याच्या निष्क्रियतेची तरतूद या दोन्ही बाबी संविधानाच्या चौकटीतच अंतर्भूत असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. सदर वक्तव्याची व्हिडिओ क्लिप प्राथमिक पुरावा म्हणून विचारात घेऊन तिची सत्यता, संपूर्ण संदर्भ, उद्देश आणि सामाजिक परिणाम यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. चौकशीत सामाजिक सलोखा, सार्वजनिक शांतता किंवा कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आढळल्यास भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच इतर लागू कायद्यांनुसार योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
संविधान, संविधान निर्माते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी समाजात चुकीचा संदेश जाऊ नये तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारचा सामाजिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी अनिरुद्ध शि. कांबळे, अशोक बा. कदम, एस. एन. कांबळे, प्रभाकर कांबळे, संतोष कृ. पवार, रामचंद्र ल. कांबळे, विलास बा. धनावडे, गौतम रा. कांबळे, रघुनाथ भि. कांबळे, एन. बी. कदम, ॲड. नृपेन सिद्धार्थ कांबळे यांच्यासह अनेक आंबेडकरी व संविधानवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रमोद जठार यांनी काय म्हटले होते?
भाजपच्या विधानपरिषद आमदारपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रमोद जठार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कारभाराचे कौतुक करताना राम मंदिर, अनुच्छेद ३७० आणि विविध विकासकामांचा उल्लेख केला. यावेळी बोलताना, “राम मंदिराचा ५०० वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मोदींनी सोडवला. काश्मीरमधील अनुच्छेद ३७० ला हात घालण्याची हिंमत ना नेहरूंमध्ये होती, ना संविधानकर्त्यांमध्ये; मात्र मोदींनी सत्तर वर्षांचा प्रश्न कोणताही संघर्ष न घडू देता सोडवला,” असे वक्तव्य त्यांनी केले होते.

