( रत्नागिरी /प्रतिनिधी )
कोकण किनारपट्टीसारख्या अतिसंवेदनशील भागाची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या सागरी सुरक्षारक्षकांवर आता उपासमारीचे सावट गडद होत आहे. तब्बल चार महिन्यांपासून मिळणारे मानधन थकित असल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील तब्बल 110 सुरक्षारक्षकांची आर्थिक घडी निकामी झाली आहे. कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी हातात काहीच उरले नसल्याने हे कर्मचारी अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील 70 आणि सिंधुदुर्गातील 40 सुरक्षारक्षकांचे वेतन शासनाच्या पातळीवर कुठे अडकले आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण नाही. दिवाळीसारख्या मोठ्या सणालाही या कर्मचाऱ्यांना अपेक्षित वेतन न मिळाल्याने त्यांची दिवाळी केवळ बोनसावरच निभावून गेली. राज्य शासनात कोकणाला दोन कॅबिनेट मंत्री असतानाही अशी स्थिती ओढवणे हीच खंत या रक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. विशेषतः मत्स्योद्योग खाते हे सिंधुदुर्गचे आमदार नितेश राणे यांच्या ताब्यात असताना सागरी सुरक्षेच्या कणा मानल्या जाणाऱ्या कर्मचार्यांची झालेली ही उपेक्षा अनेक प्रश्न निर्माण करते.
कोकण किनारपट्टीवरील अवैध मासेमारी रोखणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे या सुरक्षारक्षकांच्या जबाबदारीत येते. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता ते आपल्या कर्तव्यावर कायम सज्ज असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मानधनाविना त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीचा प्रसंग ओढवू लागल्याने या सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सागरी सुरक्षेसारख्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनच थकित राहणे ही अत्यंत गंभीर बाब असून, शासनाने तातडीने लक्ष घालून या सुरक्षारक्षकांना दिलासा देण्याची मागणी सर्वत्र होत आहे.

