(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील अजिवली गाव परिसरातील रस्त्यालगतचे माळरान आणि जंगलालगतच्या जागा काही समाजकंटकांकडून मद्यपानासाठी वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मद्यपानानंतर दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा तसेच फुटलेल्या काचा परिसरात बेदरकारपणे टाकल्या जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
फुटलेल्या काचा मोठ्या प्रमाणात परिसरात विखुरल्या असल्यामुळे गुरे चारण्यासाठी जाणारे गुराखी, शेतकरी, महिला, लहान मुले तसेच जनावरांच्या पायांना गंभीर दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जंगल परिसरात प्लास्टिक व काचेचा कचरा टाकल्यामुळे पर्यावरणालाही मोठा फटका बसत असून वन्यजीवांनाही धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील अनेक कुटुंबे यापूर्वीही दारूच्या व्यसनामुळे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाली आहेत. असे असतानाही या प्रकाराकडे ग्रामपंचायत, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती तसेच संबंधित प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी करून मद्यपान करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, नियमित गस्त वाढवावी, परिसराची स्वच्छता करून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“अजिवली गावाची शांतता, पर्यावरण आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

