(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे कै. प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धा उत्साहात पार पडली. डुप्लिकेट गटात अनिरुद्ध संझगिरी यांच्या नेतृत्वाखालील ‘फ्रेनिमिस’ संघाने विजेतेपद पटकावले, तर पेअर गटात रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे सचिव सचिन मुळ्ये आणि आर. व्ही. सोहोनी यांच्या जोडीने प्रथम क्रमांक मिळवत रत्नागिरीचा झेंडा उंचावला.
नक्षत्र हॉल येथे दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती सुखदा देव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. रविवारी सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभ रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले, खजिनदार विनायक मुळ्ये आणि चिंतामणी दामले यांच्या हस्ते पार पडला. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
डुप्लिकेट गटात ‘फ्रेनिमिस’ संघाचे कर्णधार अनिरुद्ध संझगिरी व सहकाऱ्यांनी ६५.६० गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक ‘सह्याद्री’ संघाने (संपथ श्रीनिवासन व सहकारी), तृतीय क्रमांक ‘अमनिरा’ संघाने (अमोल देशमुख व सहकारी), चौथा क्रमांक ‘फोर्थ तूर’ (उमाकांत सनगर व सहकारी), पाचवा क्रमांक ‘हजरनीस’ संघाने (डॉ. मिलिंद हजरनीस व सहकारी), तर सहावा क्रमांक ‘रत्नागिरी मॅंगो’ संघाने (मोहन दामले व सहकारी) मिळवला.
पेअर गटात रत्नागिरीच्या खेळाडूंनी विशेष चमक दाखवली. सचिन मुळ्ये व आर. व्ही. सोहोनी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर तृतीय क्रमांक चिंतामणी दामले व सचिन जोशी यांच्या जोडीने पटकावला. द्वितीय क्रमांक जितेंद्र क्षीरसागर व नितीन धर्माधिकारी, तर चौथा क्रमांक संजय वैद्य व अजित पाटणकर यांच्या जोडीने मिळवला. राजापूरच्या श्रीरांत ताम्हनकर व जितेंद्र करंगुटकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र ब्रिज असोसिएशनचे सचिव अनिरुद्ध संझगिरी, स्पर्धा संचालक राजीव देव, स्कोअरर विश्वनाथ, रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले, सचिव सचिन जोशी, खजिनदार विनायक मुळ्ये, चिंतामणी दामले तसेच सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्यांचेही यावेळी आभार मानण्यात आले.

