( मुंबई )
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत या प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
शिंदे शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. पक्षांतरानंतर हे सर्व खासदार प्रथमच एकत्र माध्यमांसमोर आले.
‘ट्रिपल संजय’ म्हणत शिंदेंचा टोला
पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता मिश्कील टोला लगावला. ते म्हणाले, “आज आमच्यासोबत संजय दिना पाटील, संजय जाधव आणि संजय देशमुख आहेत. आमच्याकडे ‘ट्रिपल संजय’ आहेत. चौथा संजय राठोडही आहे. त्यामुळे बाकी कोणाबद्दल बोलायची गरज नाही.”
‘उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाला’
या प्रवेशाला ऐतिहासिक वळण देत शिंदे म्हणाले, “22 जून 2022 रोजी आम्ही शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाचवण्यासाठी उठाव केला होता. त्या वेळी 40 आमदार आमच्यासोबत आले. आता पुन्हा चौकार नाही, तर षटकार मारला आहे. हा आपल्या उठावाचा दुसरा टप्पा आहे.”
ते पुढे म्हणाले, “शिवसेना हे एक कुटुंब आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कट्टर शिवसैनिक आज पुन्हा आपल्या परिवारात आले आहेत. आमचा लढा सत्तेसाठी नाही, तर बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाची भूमिका पुढे नेण्यासाठी आहे.”
महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण
उद्धव ठाकरे यांच्या गटातील सलग होत असलेल्या पक्षांतरामुळे राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. सहा विद्यमान खासदारांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची संसदीय ताकद वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील राजकीय घडामोडींवर या निर्णयाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

