(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आणि समस्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)च्या वतीने आगामी सप्टेंबर महिन्यात देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही व्यापक मोहीम आणि आंदोलन राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा या मोहिमेचा उद्देश असल्याची माहिती CJPचे अभिजीत दीपके यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मोहिमेत देशभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही दीपके यांनी केले.
शिक्षण आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर CJP आक्रमक
देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना अभिजीत दीपके यांनी शिक्षण, बेरोजगारी आणि न्यायव्यवस्थेतील समस्यांवर चिंता व्यक्त केली. शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर पदवी असूनही मोठ्या संख्येने तरुण बेरोजगार असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील ३५ वर्षांखालील लोकसंख्येचे प्रमाण मोठे असताना तरुणांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘जंतरमंतरवरील आंदोलनाने प्रश्न विचारण्याची भीती संपवली’
जंतरमंतरवरील आंदोलनाचा संदर्भ देताना दीपके यांनी या आंदोलनात विद्यार्थ्यांसोबत बेरोजगार तरुणांचाही सहभाग असल्याचे सांगितले. अशा आंदोलनांमुळे नागरिकांमध्ये प्रश्न विचारण्याची भीती कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ही केवळ ‘Gen Z’पुरती मर्यादित नसून, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांशी संबंधित व्यापक सामाजिक मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले. न्यायव्यवस्थेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिकांना वेळेत न्याय मिळण्यात अडचणी येत असल्याने न्यायव्यवस्थेबाबत नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य
देशातील या समस्या कोणतीही एक व्यक्ती किंवा संस्था एकट्याने सोडवू शकत नाही. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन नागरिक म्हणून देशाच्या प्रश्नांवर काम करण्याची गरज आहे, अशी भूमिका दीपके यांनी मांडली. समाजातील विविध घटकांकडून मिळणारा पाठिंबा एकत्रित करून ही चळवळ पुढे नेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
CJPच्या अजेंड्यावर तीन प्रमुख मुद्दे
‘कॉकरोच जनता पार्टी’ने आगामी काळात समाजकारणाच्या माध्यमातून काही प्रमुख मुद्द्यांवर काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
- शिक्षण व्यवस्था : शिक्षणातील वाढत्या अडचणी आणि व्यापारीकरणाविरोधात आवाज उठविणे.
- न्याय व्यवस्था : सर्वसामान्य नागरिकांना त्वरित आणि न्याय्य न्याय मिळावा यासाठी न्यायव्यवस्थेतील सुधारणांची मागणी करणे.
- बेरोजगारी : पदवीधर असूनही बेरोजगार असलेल्या तसेच अल्प वेतनावर काम करणाऱ्या तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडणे.
याशिवाय CJPला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांना सोबत घेऊन संघटनात्मक विस्तार करण्याबरोबरच राजकीय स्वार्थापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देण्याची भूमिका पक्षाने मांडली आहे.
‘शेवटच्या घटकाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार’
‘क्या बोलती पब्लिक’ या मोहिमेच्या माध्यमातून देशातील शेवटच्या घटकाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अभिजीत दीपके यांनी सांगितले. शिक्षण, रोजगार आणि न्यायव्यवस्थेसह सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना या आंदोलनाच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

