(कराड / वृत्तसंस्था)
मलकापूर शहरातील आगाशिवनगर परिसरातील कोणार्क पार्कसमोर उसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली दुचाकीवर पलटी झाल्याने झालेल्या भीषण अपघातात ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा २८ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. मालन मोहन सुतार असे मृत महिलेचे नाव असून, यशवंत मोहन सुतार असे जखमी मुलाचे नाव आहे. दोघेही पाटण तालुक्यातील काढणे गावचे रहिवासी आहेत. कराडमधील काम आटोपून गावाकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चचेगाव येथून ऊस घेऊन ट्रॅक्टर दोन ट्रॉलींसह कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे निघाला होता. आगाशिवनगरमधील कोणार्क पार्कसमोर ट्रॅक्टर आला असता, एका अपार्टमेंटमधून अचानक दुचाकीस्वार रस्त्यावर आल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याला वाचवण्यासाठी चालकाने जोरात ब्रेक लावला. त्यामुळे मागील बाजूस असलेली उसाने भरलेली ट्रॉली नियंत्रणाबाहेर जाऊन विरुद्ध दिशेला पलटी झाली.
याचवेळी कराडमधील काम संपवून मालन सुतार आणि त्यांचा मुलगा यशवंत दुचाकीवरून काढणे गावाकडे परतत होते. पलटी झालेली ट्रॉली त्यांच्या दुचाकीवर कोसळल्याने दोघेही उसाच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. ट्रॉलीखाली दोन दुचाकींसह दोन ते तीन जण अडकल्याची प्राथमिक माहितीही समोर आली होती.
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. नागरिकांनी उसाचा ढिगारा हटवून मालन आणि यशवंत यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. त्यांना तातडीने कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र मालन सुतार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यशवंत सुतार गंभीर जखमी असून, त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ट्रॉलीखाली अडकलेल्या अन्य एका दुचाकीस्वाराला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून, पुढील तपास सुरू आहे.


