(संगमेश्वर /प्रतिनिधी)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील शास्त्री पुलालगतच्या कसबा गाव परिसरात रस्ता ओलांडणे दिवसेंदिवस धोकादायक बनत असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या परिसरात नागरिक, पर्यटक आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांच्या मते, शास्त्री पुल परिसरात महामार्गावरील वाहनांचा वेग अत्यंत जास्त असल्याने रस्ता ओलांडताना वाहनांचा अचूक अंदाज येत नाही. परिणामी, एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता कायमच डोक्यावर घोंगावत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः या मार्गावर मोठ्या वाहनांची वर्दळ अधिक असल्याने अपघात झाल्यास जीवितहानीसह मोठ्या आर्थिक नुकसानीचाही धोका नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शास्त्री पुलापासून सुमारे २०० मीटर अंतरावर दोन्ही बाजूंना ‘वेगमर्यादा ३० किलोमीटर प्रतितास’ असे स्पष्ट दर्शविणारे फलक उभारावेत, तसेच कसबा गावातील ऐतिहासिक व पर्यटनस्थळांची माहिती देणारे दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी पुढे आली आहे.
कसबा परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांची भव्य प्रतिमा, कर्णेश्वर मंदिर, ऐतिहासिक देसाई वाडा तसेच शृंगारपूर येथील भवानी मंदिर ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणस्थळे मानली जातात. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरात विशेष उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. “अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक पावले उचलणे अधिक महत्त्वाचे आहे,” अशी भूमिका नागरिकांनी मांडली. मुंबई–गोवा महामार्गावर यापूर्वी घडलेल्या अनेक भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केवळ या ठिकाणीच नव्हे, तर संपूर्ण चौपदरी महामार्गावरील सुरक्षाव्यवस्थेचा व्यापक आढावा घेण्याची गरजही व्यक्त होत आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून शास्त्री पुल परिसरातील सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीने अमलात आणाव्यात, जेणेकरून संभाव्य दुर्घटनांना आळा बसून नागरिकांचा जीवितहक्क सुरक्षित राहील, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

