(चिपळूण / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक’ पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील तीन मुख्याध्यापकांची निवड झाली आहे. यामध्ये चिपळूण, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांतील मुख्याध्यापकांचा समावेश असून संजय वरेकर, सुरेंद्र कल्लोळे आणि श्रीशैल्य पुजारी यांना हा सन्मान जाहीर झाला आहे.
चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी, चिंचघरी (सती) चे मुख्याध्यापक संजय वरेकर, लांजा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, पुनसचे मुख्याध्यापक सुरेंद्र कल्लोळे आणि रत्नागिरी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, देऊडचे मुख्याध्यापक श्रीशैल्य पुजारी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या तिन्ही मुख्याध्यापकांना १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान पालघर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अय्युब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर, राज्य कोषाध्यक्ष संदेश राऊत आणि सहसंपादक रमेश तरवडेकर यांनी तिन्ही मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले आहे.


