(रत्नागिरी / वार्ताहर)
दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असते. आज मिळालेली कौतुकाची थाप ही पुढील आयुष्यातील यशाची शिदोरी आहे. शिक्षणाच्या विविध शाखा आज विद्यार्थ्यांसाठी खुल्या झाल्या असून प्रत्येकाने आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये सखोल ज्ञान संपादन करावे. दहावी-बारावीचे यश हे अंतिम शिखर नसून आयुष्याच्या नव्या प्रवासाचे प्रवेशद्वार आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले.
क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने देसाई बँक्वेट हॉल येथे आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी डॉ. शुभांगी बेडेकर, मंडळाच्या उपाध्यक्ष प्राची शिंदे, कार्याध्यक्ष राकेश नलावडे, खजिनदार जितेंद्र विचारे, प्रचारप्रमुख संतोष तावडे, सचिव योगेश साळवी आदी उपस्थित होते.
शिल्पा सुर्वे म्हणाल्या, “आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरी शिक्षणाच्या बळावर प्रत्येक अडचणीवर मात करता येते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यामुळे शून्यातून विश्व निर्माण करण्याची आणि संकटांमध्ये खंबीरपणे उभे राहण्याची ताकद आपल्यात आहे. कोणत्याही परिस्थितीत जिद्द सोडू नका. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आई-वडील, गुरुजन, समाज आणि संस्कृती यांचे ऋण कधीही विसरू नका.”
डॉ. शुभांगी बेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि समर्पण आवश्यक आहे,” असे सांगितले. मोबाईलचा अतिरेकी वापर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. “एक रिल पाहण्यासाठी हातात घेतलेला मोबाईल अनेकदा तासभर वेळ वाया घालवतो. त्यामुळे अभ्यासावर आणि गुणांवर परिणाम होतो,” असे त्या म्हणाल्या.
त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा आग्रह धरला. जंक फूड, बैठे जीवन आणि मानसिक तणाव यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे मोठी स्वप्ने पाहा, प्रामाणिकपणा आणि सातत्य जपा, आरोग्याची काळजी घ्या आणि समाजाने दिलेल्या योगदानाची परतफेड करण्याची भावना कायम ठेवा, असा संदेश त्यांनी दिला.
कार्याध्यक्ष राकेश नलावडे यांनी हिंदुत्वाच्या जतनाबाबत मार्गदर्शन करताना तरुणांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेबाबत पालकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली.
प्रचारप्रमुख संतोष तावडे यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती देत मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी नोकरीसोबतच उद्योजक आणि व्यावसायिक बनण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन केले. त्यासाठी मंडळाकडून आवश्यक ते मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उपाध्यक्ष प्राची शिंदे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्राची भावी संपत्ती संबोधत निरोगी आणि सुदृढ पिढी घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचून त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रेया पाटील हिने गणेशवंदना सादर केली. दीपप्रज्वलनानंतर प्रमुख पाहुण्यांचा पुष्परोप देऊन सत्कार करण्यात आला. सचिव योगेश साळवी आणि अमित कदम यांनी सूत्रसंचालन केले. मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी क्षत्रिय मराठा मंडळाकडून मिळणारा सन्मान आणि प्रोत्साहन ही पुढील वाटचालीसाठी मोठी प्रेरणा असल्याची भावना व्यक्त केली.

