(लांजा/ प्रतिनिधी)
भक्षाचा पाठलाग करताना सार्वजनिक विहिरीत पडलेल्या एका तरुण नर बिबट्याला वन विभागाने अवघ्या तासाभरात सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. लांजा तालुक्यातील इसवली-पाथरवाडी येथे रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेत वन विभागाने दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली असून परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
रविवारी सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास इसवली-पाथरवाडी येथील सार्वजनिक विहिरीतून प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी विहिरीत पाहणी केली असता पाण्यात एक बिबट्या अडकून पडल्याचे स्पष्ट झाले. याबाबत ग्रामस्थ अक्षय गुरव यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विशेष बचावमोहीम हाती घेण्यात आली. दोरीच्या साहाय्याने लोखंडी पिंजरा विहिरीत उतरविण्यात आला. काही वेळानंतर बिबट्या पिंजऱ्यात शिरताच अत्यंत दक्षतेने त्याला बाहेर काढण्यात आले.
प्राथमिक निरीक्षणात हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे दीड वर्ष असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लांजा येथील सहायक आयुक्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास अनुसे यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे निरोगी असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. ही बचावमोहीम विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. मोहिमेत वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे, वनरक्षक श्रावणी पवार तसेच रेस्क्यू टीमचे अमित लांजेकर आणि सागर साळवी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. याशिवाय इसवली गावचे पोलीस पाटील दत्ताराम आपणकर, सरपंच आणि ग्रामस्थांनीही बचावकार्यात मोलाचे सहकार्य केले.
दरम्यान, वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राणी मानवी वस्तीत आढळल्यास किंवा अडचणीत सापडल्यास स्वतःहून कोणताही धोका पत्करू नये. अशा प्रसंगी वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ अथवा ९०९६५७८७६१ वर तात्काळ संपर्क साधावा. वन्यजीव संवर्धन आणि मानवी सुरक्षितता यांचा समतोल राखत राबविण्यात आलेली ही यशस्वी बचावमोहीम वन विभागाच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.

