(देवळे / प्रकाश चाळके)
सीता इंडियन ट्रस्ट असोसिएशन आयोजित भव्य पुस्तक विमोचन सोहळा दिनांक ३० मे २०२६ रोजी पुणे येथील गांजवे चौकातील पत्रकार भवन ऑडिटोरियल हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध साहित्यिक पुस्तकांचे विश्वविक्रमी पंजीकरण करण्यात आले.
या सोहळ्यात देवरुख येथील सौ. भारती जयंत राजवाडे यांच्या ‘बाबा – अबोल आयुष्याचे कोडे’ या विषयावरील १० कवितांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. तब्बल ११६१ रचनांचा समावेश असलेल्या भव्य मराठी काव्यसंग्रहात त्यांच्या कवितांना विशेष स्थान मिळाले आहे.
वडिलांविषयी समाजात फारसे बोलले जात नसले तरी त्यांच्या प्रेम, आधार आणि त्यागाची भावना सौ. राजवाडे यांनी आपल्या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा त्यांच्या कवितांना वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले असून, असा मान मिळवणाऱ्या त्या संगमेश्वर तालुक्यातील पहिल्या महिला साहित्यिक ठरल्या आहेत.
राज्यभरातील साहित्यिक आणि लेखकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन आचार्य शंकर अंदानी यांनी केले होते.
कार्यक्रमाला माजी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे, खासदार निलेश लंके, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर, माजी न्यायमूर्ती सुनील वेदपाठक, ज्येष्ठ लेखक भानुदास बेरड, ज्येष्ठ कवयित्री मंदाताई नाईक, प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. श्रीकांत पाटील, कवयित्री विमल माळी, नोबेल प्राईज नोमिनेटर डॉ. सुधीर तारे, आमदार संग्राम जगताप, माजी पोलीस आयुक्त विठ्ठल जाधव, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य डॉ. नर्सिंग कदम, ज्येष्ठ लेखिका शैलजा करोडे, सोलापूर विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. शिवाजी शिंदे, नगरसेविका प्रिया शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा कोल्हटकर आणि रूपाली पाठक यांनी केले, तर विश्वविक्रम काव्यसंग्रहाचे संपादन मातृभक्त आचार्य सीए प्रा. डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केले.

