(देवरुख)
शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी गंभीर समस्या ठरत असून, विशेषतः एसटी स्टँड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी एकाच दिवशी तिघांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून देवरुख परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. एसटी स्टँड हा नेहमीच गजबजलेला भाग असल्याने येथे प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, भटक्या कुत्र्यांच्या मुक्त संचारामुळे या सर्वांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडील घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीसोबतच तीव्र नाराजीही व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी
या पार्श्वभूमीवर ‘गाव विकास समिती’ च्या वतीने देवरुख नगरपंचायतीकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. समितीचे सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे आणि सौ. दीक्षा खंडागळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत भटक्या व आक्रमक कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.
पावसाळा जवळ येत असताना अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, नगरपंचायतीने त्वरित पावले उचलून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन काय ठोस उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

