(रत्नागिरी /वार्ताहर)
पारंपरिक अध्यापनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील ३१ शिक्षकांची राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) निवडीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या शिक्षकांनी वर्गखोल्यांमध्ये राबविलेले उपक्रम आणि त्यांचे अनुभव आता राज्यातील अन्य शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत.
शासकीय आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, प्रभावी आणि विद्यार्थीकेंद्रित व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी शिक्षकांच्या कामाचे विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. दीक्षा अॅपचा वापर, ई-कंटेन्ट निर्मिती, कमी खर्चातील शैक्षणिक साहित्य तयार करणे, आधुनिक शैक्षणिक साधनांचा उपयोग, वर्गातील नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि लोकसहभागातून शाळांचा विकास यांचा त्यात समावेश होता.
रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने जिल्ह्यातील ५०२ उपक्रमशील शिक्षकांचे प्रस्ताव राज्यस्तरीय निवडीसाठी पाठविले होते. त्यातून जिल्ह्यातील १७० शिक्षकांची अंतिम निवड झाली असून, त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकांचाही समावेश आहे.
धामणसे केंद्रातील संदिप विश्वनाथ कुळ्ये (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरे देवपाट), गावडे आंबेरे केंद्रातील मंदार मारुती नार्वेकर (जिल्हा परिषद शाळा दाभीळ आंबेरे), हरचेरी केंद्रातील रीया रवींद्र राणे (जिल्हा परिषद शाळा डुगवे) आणि संजय सीताराम तांबे (जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुरतडे नं. १), जांभारी केंद्रातील स्नेहा नितीन जाधव (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सैवडे नं. २), करबुडे केंद्रातील शैलेश शिवराम शिंदे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करबुडे मूळगाव) यांची निवड झाली आहे.
खेडशी केंद्रातून अनुप्रीता गजानन कोकजे (पानवल, होरंबेवाडी) आणि प्रमोद अजित पाटील (खेडशी नाका), मिरजोळे केंद्रातून वृषाली विभाकर नाचणकर (शिळ) आणि मनाली मदन पाटील (मिरजोळे वरची वाडी), गोळप केंद्रातून सुहास रमाकांत वाडेकर (गावखडी नं. १) आणि संजीवनी संदीप भावे (पावस नं. १) यांची निवड झाली आहे. रानपाट केंद्रातील सुधीर सीताराम शिंदे (कृष्णाजी पितांबर आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी), सड्ये केंद्रातील राजेश शांताराम पवार (जिल्हा परिषद शाळा कोतवडे घारपुरी) आणि संतोष गणपत रावणंग (जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभरूण नं. १) यांचाही या यादीत समावेश आहे.
शिरगाव केंद्रातील कोमल संजय गोरे (शिरगाव मराठी) आणि वैशाली झोरे (काळबादेवी), तसेच टिके केंद्रातील अजय धोंडीराम कांबळे (कोंडखंडकर नं. १) आणि योगेश गजानन शेट्ये (उमरे हायस्कूल) यांचीही राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड झाली आहे.
जिल्हा परिषद केंद्रशाळा कळझोंडी केंद्रातील सुभाष भिकानी पालये (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कळझोंडी नं. २), जिल्हा परिषद केंद्रशाळा निरुळ केंद्रातील श्रेया सचिन कडवेकर (कोळंबे नं. १) आणि मुबारक दाऊद कुंभार्लीकर (चांदोर नं. १), तसेच जिल्हा परिषद केंद्रशाळा झरेवाडी केंद्रातील राजेश जगन्नाथ गोसावी आणि रामनाथ बने (झरेवाडी) यांची निवड झाली आहे. ओरी केंद्रातून रामदास नामदेव चव्हाण (ओरी नं. १), पूर्णगड केंद्रातून आशिष खेमा सावंत (पूर्णगड खारवीवाडा), अवधूत सहदेव शिंदे (गावखडी नं. २ बंडेबेवाडी) आणि निकेता किशनराव अरगडे (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा विल्ये) यांनाही हा बहुमान मिळाला आहे.
निवळी तिठा केंद्रातील प्रदीप शांताराम जाधव (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोके आंबेकरवाडी) आणि मदन गुणाजी डोर्लेकर (जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निवळी तिठा), पोमेंडी केंद्रातील सुखदा समीर कारेकर (पोमेंडी बुद्रुक नं. १), चाफे केंद्रातील रेखा काशिनाथ जाधव (जयगड सड्येवाडी) आणि वाटद मिरवणे केंद्रातील शिवशाला लक्ष्मण सोनटक्के (वाटद मिरवणे) यांचीही निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या शिक्षकांच्या शैक्षणिक अनुभवाचा राज्यातील अन्य शिक्षकांना लाभ मिळावा, यासाठी त्यांच्या माध्यमातून कार्यशाळा, प्रशिक्षण आणि ई-साहित्य निर्मितीचे उपक्रम राबविले जाणार आहेत. अध्यापनातील नावीन्यपूर्ण प्रयोगांबाबतही ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकांनी केलेल्या प्रयोगशील कार्याला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या अनुभवांचा उपयोग अन्य शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी होणार आहे.


