(संगमेश्वर)
मार्लेश्वर-देवरुख रस्त्यावर मुरादपूर गावाजवळील अपघातात एक वयोवृद्ध पादचारी गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी मुरलीधर श्रीधर खेडेकर (वय ३३, रा. मुरादपूर वरचीवाडी, ता. संगमेश्वर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शांताराम सिताराम पंदेरे (सहा. पोलीस उपनिरीक्षक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी मुरलीधर खेडेकर याने त्याच्या ताब्यातील हिरो कंपनीची मोटारसायकल (एमएच-०९/डिपी/७००२) बेदरकारपणे व अविचाराने चालवली. रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वाहन चालवताना, मुरादपूर येथील निलेश बांडागळे यांच्या घरासमोर रस्त्यावरून चालत असलेले आत्माराम भागोजी गोंधळी (वय ६४) यांना जोरात धडक दिली.
या अपघातात आत्माराम गोंधळी यांच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, संशयित आरोपीने वाहन चालवताना गाडीचे विमा संरक्षणही संपलेले असताना वाहन रस्त्यावर चालवले होते. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ३८/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), १२५ (अ), १२५ (य) व २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १४६/१९६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.