(देवळे / प्रकाश चाळके)
“देवा, एका सरीची उधारी दे; शेतकऱ्यांच्या स्वप्नांना उभारी दे…” अशी आर्त हाक आज संपूर्ण कोकणातील बळीराजा आकाशाकडे देत आहे. मृग नक्षत्र संपत आले, तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने भातशेतीवर अवलंबून असलेला शेतकरी चिंतेच्या छायेत आहे. पेरणी पूर्ण झाली असली तरी पावसाअभावी बियाणे उगवेल की नाही, याची धास्ती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
यंदा अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर मशागतीची कामे पूर्ण करून भाताची पेरणी केली. काही ठिकाणी धूळवाफ्यावर बियाणे टाकण्यात आले. मात्र, अपेक्षित पावसाने दडी मारल्याने जमिनीत पडलेले बियाणे कोरड्या मातीतच अडकून पडले आहे. शेतकऱ्यांनी आशेने पेरलेली स्वप्ने आता आकाशाकडे लागलेल्या नजरेवरच टिकून आहेत.
आकाशात अधूनमधून काळे ढग दाटून येतात, वाऱ्याची झुळूकही वाहते; मात्र काही क्षणांतच ढग विरून जातात आणि पावसाची आशा पुन्हा मावळते. आभाळ भरून येते, पण बरसत नाही. त्यामुळे प्रत्येक दिवसागणिक शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.
गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मृग नक्षत्रातील दमदार पावसामुळे कोकणातील शिवार हिरवेगार झाले होते. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कोकणात मान्सून दाखल होण्याचा पारंपरिक कालावधी उलटून गेला, तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही.
भातशेती ही कोकणातील हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. खरीप हंगामावर संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असल्याने पावसाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मशागतीवरील खर्च, बियाण्यांमध्ये केलेली गुंतवणूक, कर्जाचा बोजा आणि पुढील हंगामाची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
आज शेतातील प्रत्येक बांध, प्रत्येक वाफा आणि जमिनीत पडलेले प्रत्येक बियाणे जणू पावसाच्या एका सरीची आशेने वाट पाहत आहे. घरातील ज्येष्ठ मंडळी देव्हाऱ्यासमोर प्रार्थना करत आहेत, तर शेतकरी उंबरठ्यावर उभा राहून आकाशाकडे नजर लावून आहे. करपलेल्या मातीत पुन्हा जीव यावा, बियाणे रुजावे आणि शिवार हिरवेगार व्हावे, एवढीच माफक अपेक्षा आज कोकणातील बळीराजा व्यक्त करत आहे.
पावसाचा हा प्रश्न आता केवळ हवामानापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो कोकणासह तमाम शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या भविष्याचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आकाशाकडे लागले असून, पहिल्या दमदार पावसाची प्रतीक्षा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.

