(रत्नागिरी / वार्ताहर)
राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्ष्यवेध’ उपक्रमांतर्गत पुणे विभागस्तरीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी मुलींच्या हॉकी खेळाची निवड चाचणी ७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. ही चाचणी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सकाळी १० वाजता होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र महिला हॉकीपटूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
पुणे विभागाच्या क्रीडा निपुणता केंद्रासाठी यापूर्वी २३ व २४ मार्च २०२६ रोजी ॲथलेटिक्स, शूटिंग, रोईंग, कुस्ती, टेबल टेनिस आणि हॉकी या सहा खेळांसाठी निवड चाचणी घेण्यात आली होती. मात्र, त्यावेळी मुलींच्या हॉकीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे केवळ मुलींच्या हॉकीसाठी पुन्हा निवड चाचणी घेण्यात येत आहे.
पात्रता काय?
या निवड चाचणीसाठी संबंधित वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी वय २५ वर्षांच्या आतील खेळाडू पात्र असतील. तसेच खेळाडूने अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा किंवा राज्यस्तरीय स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेले असणे आवश्यक आहे.
ही कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक
निवड चाचणीसाठी उपस्थित राहताना खेळाडूंनी स्वतःचे आवश्यक क्रीडा साहित्य सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच खालील मूळ कागदपत्रे सोबत आणावीत :
- जन्मदाखला
- शाळा सोडल्याचा दाखला (LC)
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
- आधार कार्ड
- मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र
- शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी आपल्या निवास व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
‘मिशन लक्ष्यवेध’चा उद्देश
राज्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘मिशन लक्ष्यवेध’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा बळकट करणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे, विविध स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना प्रोत्साहनपर पुरस्कार देणे, करिअर मार्गदर्शन करणे तसेच देश-विदेशातील संस्थांच्या सहकार्याने खेळाडूंच्या क्षमतांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे.
निवड चाचणीसंदर्भात अधिक माहितीसाठी खेळाडूंनी शिवछत्रपती क्रीडा संकुलातील प्रतिनिधींशी संपर्क साधावा.
वैशाली सूळ : ७४४७४९१८८८
विवेंडा डिकोस्टा : ९८२३९३२०९७

