(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे ते शास्त्रीपुल या मार्गाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे थेट जीव धोक्यात घालण्यासारखे बनले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल, मोठे आणि विखुरलेले खड्डे तयार झाले असून, वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत आपली वाहने चालवावी लागत आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आठवडाभरापूर्वीच ठेकेदाराला खड्डे तातडीने भरून रस्ता सुरळीत करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ठेकेदाराने त्यांना जुमानलेले नाही. परिणामी, रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ राहिली असून, नागरिकांच्या संतापाला उधाण आले आहे.
खड्डे, अपघात आणि ठेकेदाराची बेफिकिरी
बावननदी ते आरवली दरम्यान सुमारे ४० किलोमीटर अंतराचा महामार्गाचा भाग एका खासगी ठेकेदाराकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, कामाच्या सुरुवातीपासूनच या ठेकेदाराने अत्यंत कुचकामी आणि धीम्या गतीने काम केले. यामुळे या भागात अनेकांना अपघातात जिव गमवावा लागला असून, काही जण कायमचे अपंग झाले आहेत.
या दुर्घटनांना खड्डे, मार्गदर्शक फलकांचा अभाव, अपुऱ्या सूचना आणि नियोजनशून्य कारभार कारणीभूत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेची अनेक वेळा तक्रार होऊनही ठेकेदार आणि संबंधित यंत्रणा ढिम्म असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘मी मारल्यासारखा करतो, तू रडल्यासारखा कर’ – प्रशासनाचा लपंडाव सुरूच
खड्ड्यांमध्ये साचलेले मातीमिश्रित पाणी, उडणारे चिखलाचे फवारे, त्यामुळे होणारी प्रवासी आणि वाहनधारकांमध्ये भांडणे हे आता या मार्गाचे नवे वास्तव बनले आहे. वारंवार जनतेने तक्रारी करूनही, छायाचित्रांसह माध्यमांनीही आवाज उठवूनही, प्रशासनाची आणि ठेकेदाराची बेपर्वाई सुरुच आहे.
पालकमंत्र्यांचाही आदेश धाब्यावर
गेल्या आठवड्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः रस्त्याची पाहणी केली आणि ठेकेदाराला एक आठवड्याची मुदत देऊन खड्डेमुक्त रस्ता करण्याचे आदेश दिले. परंतु, आठवडा उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आता ठेकेदार आणि संबंधित अधिकारी स्वतः पालकमंत्र्यांनाही जुमानत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
कोळंबे ते शास्त्रीपुल हा रस्ता अक्षरशः धोकादायक बनला असून, वाहनधारक आणि प्रवासी रोज अपघाताच्या छायेतून प्रवास करत आहेत. प्रशासन आणि ठेकेदाराच्या मुजोरीमुळे जनतेचा संयम सुटत चालला आहे. आता प्रश्न हा आहे की, शासन यावर गांभीर्याने कधी कारवाई करणार? की आणखी काही निष्पाप जीव गेल्यावरच जाग येणार?