(संगमेश्वर / एजाज पटेल)
डिंगणी मुख्य रस्त्यावरून कोंड असुर्डे येथील संदेश कापडी यांच्या घराकडे जाणाऱ्या जोडरस्त्याच्या काँक्रिटकरण कामाचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या कामामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कसबा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या विशाखा कुवळेकर यांच्या प्रयत्नांतून या कामाला मंजुरी मिळाली. रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन त्यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था
संदेश कापडी यांच्या घरापासून सुरू होणारा हा रस्ता डिंगणी मुख्य रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून पुढे जांभूळवाडी आणि धामापूरकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी तो अत्यंत उपयुक्त आहे. तीव्र चढ-उतार आणि वळणांमुळे हा मार्ग आधीच अवघड असून त्यातच रस्त्यावरील डांबर उखडून मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
पावसाळ्यात चिखल आणि घसरड्या रस्त्यामुळे अनेक किरकोळ अपघात घडत होते. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत होता. आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत होता.
जनसुविधा योजनेतून मंजुरी
स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या काँक्रिटकरणाची मागणी जिल्हा परिषद सदस्या विशाखा कुवळेकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर जनसुविधा योजनेअंतर्गत या कामाला मंजुरी मिळाली. त्यामुळे आता या मार्गाचे काँक्रिटकरण होऊन वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद सदस्या विशाखा कुवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. उपसरपंच विश्राम डावळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच सोनल शिंदे, उपसरपंच मिथुन निकम, श्रीराम शिंदे, रोशन शिंदे, संजय शिंदे, राजहंस शिंदे, शशिकांत गुरव, संतोष मुंडेकर, सुजित शिगवण, ग्रामविकास अधिकारी लवा पाचवे, महेश मुरकर, संदेश कापडी यांच्यासह ग्रामस्थ, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवास होणार अधिक सुरक्षित
रस्त्याचे काँक्रिटकरण पूर्ण झाल्यानंतर कोंड असुर्डे, जांभूळवाडी, धामापूर आणि डिंगणी परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. विशेषतः पावसाळ्यातील चिखल, खड्डे आणि वाहतुकीच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
भूमिपूजनप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी, “अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने मोठा दिलासा मिळाला आहे,” अशी भावना व्यक्त करत या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

