(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर–सप्तेश्वर मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांच्या खासगी जमिनीवर मोबाईल केबल भूमिगत टाकण्यासाठी संबंधित ठेकेदाराने कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता खोदाई केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. विशेष म्हणजे ज्या विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता येतो, त्या संबंधित शासकीय विभागाचीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले.
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरून सप्तेश्वरकडे जाणारा हा रस्ता अरुंद, तीव्र चढ-उतारांचा आणि वेडेवाकड्या वळणांचा आहे. अशा धोकादायक रस्त्यालगत साईड पट्टीची खोदाई करण्यात आल्याने भविष्यात मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला होता. मोटार वाहन अधिनियम, रस्ते सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे आणि शासकीय नियमांनुसार कोणतीही खोदाई करण्यापूर्वी संबंधित विभागाची लेखी परवानगी घेणे आणि रस्त्याची सुरक्षितता अबाधित ठेवणे बंधनकारक आहे. मात्र या सर्व नियमांना ठेकेदाराकडून सर्रास डावलण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
या मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. भविष्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होऊन अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण होते. बेकायदेशीर खोदाईची छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर तसेच स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध होताच प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले.
शासकीय रस्त्यालगतची जमीन तसेच नागरिकांच्या खासगी मालकीच्या जागेत बेकायदेशीर खोदाई केल्याचा प्रकार उघड होताच नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर संबंधित ठेकेदाराने तात्काळ खोदाई करण्यात आलेले चर पूर्ववत भरून काढले. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका टळला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वेळीच आवाज उठवला गेल्यामुळे आणि सामाजिक प्रसारमाध्यमे तसेच वृत्तपत्रांतून हा विषय ठळकपणे मांडला गेल्यामुळेच ही कारवाई शक्य झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. कोणतेही विकासकाम कायदा व नियमांचे पालन करूनच करणे आवश्यक आहे, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनू शकतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या सजग भूमिकेबद्दल आणि विषयाला वाचा फोडणाऱ्या प्रसारमाध्यमांबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

