(देवरूख /प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथिल कोंडू बिरु जांगळी यांची म्हैस रानात चरायला गेली असताना विद्युत तारा तुटल्याने विजेचा धक्का लागून म्हैशीचा जागीच मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर गावचे उपसरपंच व कडवई विकास संस्थेचे चेअरमन दत्ताराम ओकटे यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी संचालक राजेंद्र सुर्वे यांच्या निदर्शनास आणून दिली.
याबाबत सुर्वे यांनी शेतकऱ्यांला काही मदत मिळावी म्हणून बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे व उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांना विनंती केली. त्यावर सर्व संचालक मंडळाने कोंडू जांगळी यांना रक्कम रु.१०,०००/- (अक्षरी रु.दहा हजार मात्र) आर्थिक मदत मंजुर केली.
सदर मदतीचा धनादेश जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे व संचालिका सौ.नेहा माने यांचे हस्ते देवरूख येथिल बॅक शाखेत केलेल्या समारंभात कोंडू ज़ांगळी यांना सुपूर्द करण्यात आला त्यावेळी बँकेमधील संगमेश्वर तालुक्याचे तुषार साळुंखे, सहा. सरव्यवस्थापक उपस्थित होते.
अशा नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील दारिद्रय़रेषेखालील शेतकरी वर्गाने जनावरांचे काही नुकसान झाले असेल तर अशांनी त्वरीत आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक सुर्वे यांनी केले.

