( पंढरपूर )
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्ती संवर्धनासाठी प्रस्तावित लेपन प्रक्रियेला विरोध करणाऱ्या याचिकेला जिल्हा न्यायालयाने नकार दिला आहे. स्थगिती अर्ज फेटाळल्याने मंदिर समितीचा मार्ग मोकळा झाला असून, भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली 23 आणि 24 जून रोजी नियोजित लेपन प्रक्रिया पार पडणार आहे.
पंढरपूरचे भीमाचार्य बाळाचार्य वरखेडकर यांनी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील लेपन प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे मंदिर समितीने आखलेली संवर्धन प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार राबविण्याचा मार्ग खुला झाला आहे. मूर्ती संवर्धनाचे काम सुरळीत पार पडावे यासाठी 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या दोन दिवसांत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली मूर्तीवर विशेष लेपन प्रक्रिया केली जाणार आहे.
मूर्तीच्या संवर्धनासाठी लेपन आवश्यक
भारतीय पुरातत्त्व विभागाने केलेल्या पाहणीत कालांतराने मूर्तीची झीज झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. मूर्तीचे दीर्घकालीन संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष लेपन करण्याची शिफारस विभागाने केली असून त्यानुसार ही प्रक्रिया केली जाणार आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, न्यायालयाने कोणताही स्थगिती आदेश दिलेला नसल्यामुळे नियोजित कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच मंदिर समितीच्या निर्णयानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शिफारशींसह ऑर्गॅनिक पद्धतीचाही वापर या प्रक्रियेत केला जाणार आहे.
आणखी एका याचिकेच्या निर्णयाकडे लक्ष
दरम्यान, राष्ट्रीय मंदिर महासंघाचे गणेश लंके यांनी रासायनिक लेपनाऐवजी पारंपरिक आयुर्वेदिक व्रजलेप करण्याची मागणी करत स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. या अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर आज अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती संवर्धनाचा विषय पुन्हा चर्चेत आला असून वारकरी, भाविक आणि धार्मिक संघटनांचे लक्ष आता पुढील न्यायालयीन निर्णयाकडे लागले आहे. मात्र सध्या तरी नियोजित लेपन प्रक्रियेला कोणताही कायदेशीर अडथळा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

