(रोहा / रायगड)
रायगड जिल्ह्यातील रोहा-नागोठणे मार्गावर रविवारी भीषण अपघात घडून 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नागेश्वर मंदिरासमोरील भिसे खिंड परिसरात केटीएम मोटरसायकल आणि वेस्टेज मटेरियल वाहून नेणाऱ्या डंपरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामुळे संपूर्ण रोहा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणाची ओळख राज गणेश पतंगे (वय 22, रा. अष्टमी कोळीवाडा, ता. रोहा, जि. रायगड) अशी झाली आहे. अपघात इतका भीषण होता की, डंपरने मोटरसायकलला सुमारे 60 फूटांहून अधिक अंतर फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर डंपर रस्त्यालगतच्या शेतात पलटी झाला. मात्र, चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस, रेस्क्यू पथक आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
रोहा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-06/BV-7594 क्रमांकाचा डंपर चालक पंकज अरुण मिस्त्री (वय 29, रा. पाटणसई, ता. रोहा) हा भिसे खिंड घाटातून भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालवत होता. घाटातील तीव्र वळणावर त्याने नागोठणेकडून रोह्याकडे येणाऱ्या एमएच-06/CT-6709 क्रमांकाच्या केटीएम मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात राज पतंगे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने जखमीला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप असून त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस निरीक्षक एम. आय. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. फरार डंपर चालकाचा शोध सुरू असून अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या भीषण अपघातामुळे रोहा-नागोठणे मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

