(देवगड / सिंधुदूर्ग)
कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरातील रहिवासी चेतन मोहन परब (वय ३५) यांचा समुद्रात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. काल (बुधवारी) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर-मिठमुंबरी मार्गालगतच्या समुद्रकिनारी ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे कुणकेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन परब हे आपल्या मित्रांसोबत समुद्रकिनारी खेकडे (कुरल्या) पकडण्यासाठी गेले होते. रात्रीच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यावरील खडकावरून जात असताना अचानक त्यांचा पाय घसरला. त्याचवेळी समुद्राला मोठी भरती असल्याने उसळणाऱ्या लाटांच्या जोरदार प्रवाहात ते वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह संबंधित यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, या दुर्घटनेत चेतन परब यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेने कुणकेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, परब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चेतन परब यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांमधून शोक व्यक्त केला जात आहे.

