(देवरूख)
लांजा तालुक्यातील वेरवली येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रीराम विद्यालय व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय तसेच का. रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूल, वेरवली यांच्या संयुक्त विद्यमाने, श्री. शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण सोहळ्यानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ‘पोर्ट्रेट (व्यक्तिचित्र)’ हा विषय आयोजकांनी निश्चित केला होता. स्पर्धकांना भारतीय खेळाडू, चित्रपट व नाट्य कलाकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, राष्ट्रपुरुष, प्रसिद्ध राजकारणी किंवा देवी-देवता यांपैकी एका व्यक्तिमत्त्वावर आधारित रांगोळी साकारायची होती. विलास रहाटे यांनी जागतिक कीर्तीचे भारतीय शिल्पकार स्व. राम सुतार यांच्या जीवनावर आधारित ३x४ फूट आकाराची प्रभावी व कलात्मक रांगोळी साकारली.
अवघ्या १२ तासांत पूर्ण केलेल्या या रांगोळीत ‘भारताचे लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी, हा स्व. राम सुतार यांनी घडवलेला जगप्रसिद्ध पुतळा, तसेच राम सुतार यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या तीन विविध छबी अत्यंत सूक्ष्मतेने साकारण्यात आल्या होत्या. कलात्मकता, विषयाची मांडणी आणि सादरीकरण या सर्व बाबींमध्ये ही रांगोळी विशेष ठरली.
प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विलास रहाटे यांना आयोजकांच्या वतीने रोख रक्कम रुपये ११,०००, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून रांगोळी कलेतील त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
छायाचित्र:
१) प्रथम क्रमांक पटकावलेली विलास रहाटे यांची आकर्षक रांगोळी
२) मान्यवरांच्या हस्ते विलास रहाटे यांचा सन्मान
(छाया: आदित्य कुंभार)

